
सावंतवाडी : सैनिक स्कूल आंबोली या संस्थेतील नवीनच सुरू करण्यात आलेल्या भव्य व्यायाम शाळेचे उद्घाटन क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले.
जिल्हा क्रीडा विभाग, सिंधुदुर्ग आणि उपसंचालक क्रीडा विभाग, कोल्हापूर यांच्या माध्यमातून सैनिक स्कूल, आंबोलीला विविध प्रकारच्या आधुनिक व्यायाम साहित्याची मदत मिळाली आहे. क्रीडा क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहिलेल्या सैनिक स्कूलमधील विद्यार्थ्यांना या सुसज्ज व्यायामशाळेमुळे निश्चितच लाभ होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांसाठी व्यायाम आणि खेळाचे महत्त्व विशद केले. आंबोली ग्रामपंचायतीच्या प्रथम नागरिक सरपंच सौ. सावित्री पालेकर यांनीही या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती दर्शविली. सैनिक स्कूल, आंबोली ही आंबोली गावासाठी अभिमानाची बाब आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
क्रीडा अधिकारी विद्या शिरस आणि सरपंच सौ. सावित्री पालेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाला संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष सुनील राऊळ, संचालक जॉय डाॅन्टस, कार्यालयीन सचिव श्री. दीपक राऊळ, प्राचार्य एन.डी. गावडे, प्रशिक्षक, क्रीडा शिक्षक, सर्व शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी शाळेचे प्राचार्य एन.डी. गावडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन प्रा. हंबीरराव आडकूरकर यांनी केले.