विद्यार्थ्यांकडे जिद्द, चिकाटी असणे गरजेचे : उमेश येरम

बॅ. खर्डेकर महाविद्यालयाच्या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन
Edited by: दिपेश परब
Published on: January 14, 2025 16:54 PM
views 130  views

वेंगुर्ला : विद्यार्थ्यांकडे जिद्द व चिकाटी असणे गरजेचे यामुळे भविष्यात ते मोठे शिखर गाठू शकतात. क्रीडा महोत्सवांमुळे विद्यार्थ्यांना आपल्या अंगातील सुप्त गुण दाखवण्याची संधी असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या क्रीडा महोत्सवात उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन खिळाडूवृत्तीचे प्रदर्शन करावे असे प्रतिपादन वेंगुर्लेचे माजी नगरसेवक तथा शिवसेना शहरप्रमुख उमेश येरम यांनी वेंगुर्ले येथे केले. 

येथील बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाच्या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन उमेश येरम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व क्रीडा ज्योत पेटवून करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. तत्पूर्वी बॅ. बाळासाहेब खर्डेकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्राचार्य प्रा. गावडे यांनी विद्यार्थ्यांनी खिलाडूवृत्तीने स्पर्धेत खेळावे अशा शुभेच्छा दिल्या. या महोत्सवात क्रिकेट ,व्हॉलीबॉल, कबड्डी, रस्सीखेच, डॉज बॉल इत्यादी क्रीडा प्रकार व स्पर्धा लीग पद्धतीने खेळवण्यात येणार आहेत.

यावेळी व्यासपीठावर प्रभारी प्राचार्य वामन गावडे, पर्यवेक्षक डी जी शितोळे , सुरेंद्र चव्हाण, डी. एस. पाटील, क्रीडा संचालक जे. वाय. नाईक, जिमखाना प्रमुख व्ही.पी.देसाई, क्रीडा शिक्षक वासुदेव गावडे, हेमंत गावडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशांक कोंडेकर यांनी केले. तर आभार हेमंत गावडे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील कनिष्ठ विभागातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.