ओसरगाव आंबेरकर दुकान बस थांब्याचे लोकार्पण !

नारायण परब यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झाला सोहळा
Edited by: उमेश बुचडे
Published on: October 27, 2022 14:20 PM
views 217  views

कणकवली : एसटी सेवा सुरू असल्यापासून मुंबई गोवा हायवेचा ओसरगाव गवळवाडी येथील प्रसिद्ध आणि शासन दरबारात नोंद असलेला आंबेरकर दुकान बस थांबा सतत सुरु असून प्रवाशाना सेवा देत आहे. पूर्वी गावोगावी वाहतूक आणि रस्ते नसल्याने ओसरगाव, कसवण, बोर्डवे, असरोंडी, असगणी येथील प्रवासी याच थांब्यावरून एसटीने प्रवास करत. त्यावेळी  या थांब्यावर प्रवाशांची कायम वर्दळ चाले. तो काळ असा होता मुंबईला गेलेला नोकरदार वर्षातून एकदाच गावी येई. गावी येणारी एसटी अवेळी रात्री किंवा पहाटे पोहोचे. अशावेळी कंदीले घेऊन गावकरी या आंबेरकर दुकानावर वस्ती करत. आंबेरकर दुकान हे त्यावेळेचे निरोपांचे, संदेश वहनाचे, राजकीय गप्पांचे ठिकाण आणि चावडीच. कोकण गांधी आप्पासाहेब पटवर्धन यांचेही या दुकानास पाय लागले होते.

अलीकडे हायवेच्या चौपदरीकरणात जिल्ह्यातील सर्वच थांबे उलटे पालटे झाले, हायवे अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे व निष्काळजीपणामुळे थांब्याचे बांधकाम अनेक ठिकाणी झालेले नाही. सातत्याने पाठपुरावा करूनही दाद देत नसल्याने आंबेरकर (मुळ गाव आंबेरी म्हणून परबाना आंबेरकर असे नाव. पुर्वी अनंत परब यांचे चहाचे हाॕटेल होते म्हणून आंबेरकर दुकान परब कुटुंबीयांचे मुंबई, पुणे, परदेशी असणाऱ्या आणि  स्थानिक परब मंडळीनी स्वखर्चाने प्रवाश्यांच्या सेवेसाठी सुंदर, रेखीव आणि मजबूत असे थांब्याचे बांधकाम करून सुपूर्द केले. आपणही पुढे एक पाऊल टाका आणि शासनास मदत, असा आदर्श ठेऊन जनमानसात एक संदेश दिला व थांब्याचा इतिहास लोप होऊ न देता तो जिवंत ठेवला आणि परंपरा देखील  जोपासली.

थांब्याचे उदघाटन परब कुंटुबातील जेष्ठ नारायण परब यांच्या हस्ते श्री महादेव परब, स्थानिक जेष्ठ श्री पाडुंरंग आंगणे यांच्या व समस्त आंबेरकर परब परिवाराच्या च्या  उपस्थितीत करण्यात आले. थांब्यामुळे ऊन, पाऊस, वारा यापासून प्रवाशाना निवारा झाल्याने परब कुटुंबियाचे प्रवाशांकडून आभार व्यक्त केले जात आहेत.