सती चिंचघरीत नवीन प्ले स्कूलचा शुभारंभ

Edited by: मनोज पवार
Published on: July 23, 2024 14:43 PM
views 255  views

चिपळूण : सह्याद्री शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा खेर्डी चिंचघरी (सती) ता. चिपळूण या विद्यालयाच्या पूर्व प्राथमिक विभागामध्ये सह्याद्री शिक्षण संस्थेने नव्याने प्ले स्कूल सुरू केले आहे.

 या प्ले स्कूलचे उद्घाटन चिपळूण पंचायत समितीच्या माजी सभापती  पूजा शेखर निकम, शालेय समितीचे सदस्य निर्मळ, माध्यमिकचे मुख्याध्यापक वरेकर, पाग इंग्लिश मिडियम स्कूलचे मुख्याध्यापक  महेंद्र साळुंखे, सावर्डे इंग्लिश मिडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका मीरा जोशी,  कोल्हापुरे तसेच पालक, शिक्षक संघ, माता पालक संघ, शाळा व्यवस्थापन समिती या सर्व समित्यांचे पदाधिकारी पदाधिकारी, पालक, प्ले स्कूलमध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे पालक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

उपस्थित पदाधिकाऱ्यांनी प्रथम प्ले स्कूलच्या नाम फलकाचे अनावरण केले. त्यानंतर दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून चिमुकल्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू व खाऊचे वाटप करण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवरांचे शाळेच्यावतीने पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी पूजा निकम यांनी आपल्या मनोगतात शाळेच्या कामकाजाविषयी भरभरून कौतुक केले. तसेच शाळेसाठी शुभेच्छा दिल्या. 

कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक अरविंद सकपाळ, इंग्लिश मिडीयमच्या मुख्याध्यापिका समीक्षा पिटले, शिशुविहारच्या मुख्याध्यापिका सौ. ममता ठसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तयारी करण्यात आली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सौ. अपूर्वा शिंदे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर, कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.