कुडाळ बस स्थानकात मोबाईल चार्जिंग स्टेशनचे लोकार्पण

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: September 02, 2025 17:14 PM
views 330  views

कुडाळ: प्रवाशांना मोबाईल चार्ज करण्याची सुविधा मिळावी या उद्देशाने कुडाळ बस स्थानकात आमदार निलेश राणे यांच्या हस्ते मोबाईल चार्जिंग स्टेशनचे लोकार्पण करण्यात आले. नगरसेवक अभिषेक गावडे आणि विलास कुडाळकर यांच्या वतीने हे चार्जिंग स्टेशन बसविण्यात आले आहे.

प्रवासादरम्यान मोबाईल चार्ज करणे अनेकदा शक्य होत नाही आणि चार्जिंग पॉइंट शोधण्यात प्रवाशांचा वेळ वाया जातो. ही समस्या लक्षात घेऊन अभिषेक गावडे आणि विलास कुडाळकर यांनी पुढाकार घेऊन बस स्थानकात हे मोबाईल चार्जिंग स्टेशन बसवले आहे. त्यांच्या या चांगल्या उपक्रमाचे आमदार निलेश राणे यांनी कौतुक केले. याप्रसंगी बोलताना त्यांनी, 'असे आणखी हजार चार्जिंग स्टेशन बसवा,' अशा शब्दांत अभिषेक गावडे आणि विलास कुडाळकर यांना प्रोत्साहन दिले.

यावेळी जि. प. माजी अध्यक्ष संजय पडते यांच्या हस्ते नारळ वाढवून या सुविधेचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, तालुकाप्रमुख विनायक राणे, शहरप्रमुख अभी गावडे, चांदणी कांबळी, विलास कुडाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. जनसामान्यांकडून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.