
मंडणगड : पावसाळ्यातील आपत्तकालीन परिस्थितीवर मात करीत कुठल्याही परिस्थितीत मंडणगड येथील कनिष्ठ दिवाणी न्यायालयाचे नवीन इमारतीचे निर्देशीत वेळेतच उद्घाटन करण्याचे यंत्रणेने निर्धारीत केलेले लक्ष गाठण्यात सर्व यंत्रणांना अपयश आल्याने न्यायालयाचे नवीन इमारतीचा उद्घाटनाचा मुहूर्त लांबणीवर पडला आहे. भर पावसात इमारतीचे काम पुर्ण नसताना उद्घाटनाचा अट्टहास कोणी व का केला असा प्रश्न तालुकावासीयांसमोर निर्माण झाला आहे.
गेल्या एक महिन्यापासून न्यायपालिकेसह सर्वच यंत्रणांनी याकरिता कंबर कसुन काम केले होते. शेवटच्या टप्यात सहाशेहून अधिक कुशल व अकुशल कामगार दिवस रात्र काम पुर्ण करण्यासाठी झटत होते. कामाचे नियोजन व या निमीत्ताने देशाचे सरन्यायाधीस व मुख्यमंत्री यांच्यासह तालुक्यात दाखल होणाऱ्या अतिमहत्वाच्या व्यक्तीच्या दौऱ्याकरिता प्रत्यक्ष काम करणाऱ्यांपेक्षा कितीतरी अधिक माणसे पाहणी व नियंत्रणाच्या कामात व्यस्त झाली होती. याकरिता वरिष्ठ पातळीवर सर्वच यंत्रणा गेल्या दहा दिवसापासून तालुक्यात डेरेदाखल झालेली होती. घाई गडबडीत उद्घाटानाचे शिवधनुष्य पेलण्याच्या प्रयत्नात गरज नसतानाही खर्ची पडलेली श्रमशक्ती व वेळ यांचे झालेले नुकसान कितीतरी मोठे आहे. कार्यक्रमासंदर्भात कुठलीही अधिकृत घोषणा कुठल्याही यंत्रणेने केलेली नसली तरी सर्व काम वरुन आलेल्या आदेशान्वये सुरु होती हे तितकेच खरे आहे. खराब हवामान म्हणा की अन्य कारणांनी उद्घाटनाचा कार्यक्रम पुढे जाणार हे कार्यक्रमाचे तीन दिवस आधीच स्पष्ट झाले. बांधकाम विभागाने घाईगडबडीत केलेल्या कामाची गुणवत्ता कामाचे परिपुर्तीच्या तांत्रीक बाबींचे कसोटीवर किती टिकणारी आहे हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. काम सुरु असताना इमारतीस लागलेली गळीत व दर्शन भागासह विविध मजल्यावर वारंवार गळून पडणारे प्लास्टर या बद्दल तालुक्यात सार्वत्रिक चिंता व्यक्त होत असताना राजहट्टापुढे कोणाचे काहीही चालत नसल्याने अधिकाऱ्यांनी दिलेली उत्तरे निश्चीतच समाधानकारक होती असे म्हणता येणार नाही. कुठल्याही मार्गाने तालुक्यात काहीतरी विधायक कार्य उभे रहात असल्याने बांधकामातील दोशांकडे सर्वांनीच दुर्लक्ष केलेले होते. उद्घाटनाची नवीन तारीख अनिश्चत काळासाठी लांबणीवर न पडता लवकरच जाहीर होण्याची शक्यता बोलून दाखवली जात आहे.
उद्घाटन सोहळ्यासाठी व ऐतिहासीक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी इच्छुकांची बदलेल्या घटनाक्रमामुळे मोठी निराशा झाली आहे याचबरोबर तयारीच्या कामात दिवस रात्र मेहनत करणार्या अनेकांची मेहनत व्यर्थ गेली आहे. अथक प्रयत्नानंतरही इमारतीकडे जाणारा रस्ता, इमारतीची सुरक्षा भिंत, हँलीपड ते इमारत रस्ता, इमारतीची दर्शनी बाजूंची सर्व कामे अथक प्रयत्नानंतरही व पावसाच्या उपस्थितीनी अपुर्ण राहण्याची शक्यता अधिक वाटत असल्याने हा निर्णय घेण्यात आला अगर कसे याबद्दल कुठलिही स्पष्टता अद्याप आलेली नाही.
कमी पर्जन्यमान पावसाने साथ देऊनही यंत्रणेचे पदरी अपयश- यंदाचे मान्सुनचे हंगामातील पावसाला सुरुवात झाल्यापासून 13 ऑगस्ट 2025 अखेर तालुक्यात 1830 मिलीमीटर इतका पाऊस पडून गेला आहे. वार्षिक सरासरीच्या 46.98 टक्के इतका पाऊस पडुन गेला आहे. गतवर्षी म्हणजे 13 ऑगस्ट 2024 रोजी तालुक्यात 2796.80 मिलीमीटर इतका पाऊस पडून गेला होता व वार्षिक सरासरीच्या 71.77 टक्के इतकी होती. म्हणजेच गतवर्षीच्या सरासरीच्या साधारण 25 टक्के इतके कमी पर्जन्यमान यंदा तालुक्यात झाले आहे. म्हणजेच पावसाने परिपुर्ण साथ दिलेले असतानाही काम पुर्ण करण्यात यश मिळाले नाही असे का झाले याचा अभ्यास या निमीत्ताने होणे गरजेचे आहे. कारण घाई गडबडीने उद्घाटन करण्याच्या प्रयत्नात मोठे मनुष्यबळ यंत्रणा कामास लागली. त्याकरिता मोठ्या प्रमाणात निधी ही खर्ची पडला पण फलित काहीच निष्पन्न झालेले नाही.