
चिपळूण : गोविंदराव निकम क्रीडा नगरीमधील सीझन बॉल (टर्फ विकेट) क्रिकेट मैदानातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडतील, असा विश्वास आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू व्यंकटेश अय्यर व रिंकू सिंग यांनी व्यक्त केला.
आमदार शेखर निकम यांच्या पुढाकाराने खरवते दहिवली येथील गोविंदराव निकम क्रीडा नगरीमध्ये शिक्षण संस्थेतर्फे सीझन बॉल टर्फ विकेट क्रिकेट मैदान तयार करण्यात आले आहे. या मैदानाचे नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू वेंकटेश अय्यर, रिंकू सिंग, भारतीय संघाचे माजी यष्टीरक्षक चंद्रकांत पंडित, प्रशिक्षक दिनेश लाड, सचिन कोळी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू वेंकटेश अय्यर व रिंकू सिंग यांनी या मैदानातील सोयी सुविधा पाहून समाधान व्यक्त केले. तर या मैदानात रणजी स्पर्धा देखील होऊ शकते, असा विश्वास व्यक्त केला. तर भारतीय संघाचे माजी यष्टीरक्षक चंद्रकांत पंडित यांनी आपल्या मनोगतात आमदार शेखर निकम यांनी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक करीत गोविंदराव निकम क्रीडा नगरीच्या सिझन बॉल टर्फ क्रिकेट मैदानात स्थानिक क्रिकेटपटूंना चांगले मैदान मिळाले आहे. या मैदानातून रणजी व आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू घडतील, असा विश्वास व्यक्त केला.
तर आमदार शेखर निकम यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू वेंकटेश अय्यर, रिंकू सिंग, भारतीय संघाचे माजी यष्टीरक्षक चंद्रकांत पंडित, प्रशिक्षक दिनेश लाड, सचिन कोळी आदींचे स्वागत करीत या मैदानीच्या उभारणीचा हेतू स्पष्ट केला.
यावेळी सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भुवड, सेक्रेटरी महेश महाडीक, माजी सभापती सौ. पूजा निकम, अनिरुद्ध निकम, सावर्डेच्या सरपंच सौ. समीक्षा बागवे, सुभाष मोहिरे, उपसरपंच जमीर मुल्लाजी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस जयंद्रथ खताते, दशरथ दाभोळकर, सचिन पाकळे, केतन पवार, डॉ. सुनीतकुमार पाटील, विपुल घाग, अमित सुर्वे, मजीद मुल्लाजी, सतीश सावर्डेकर, अशोक काजरोळकर, विकास घाग, मयूर खेतले आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार बिजीतकर यांनी केले.