जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सवाचं उद्घाटन

Edited by:
Published on: January 06, 2025 19:45 PM
views 14  views

सिंधुदुर्गनगरी : मुलांचा बौध्दिक विकासासोबतच शारीरिक आणि मानसिक विकास होणे आवश्यक आहे. यासाठी त्यांच्यामध्ये सांघिक भावना निर्माण होणे गरजेचे आहे. खेळादरम्यान शिकलेली कौशल्ये मुलांच्या विकासात महत्वाची भूमिका बजावत असतात. म्हणूनच मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सव महत्वाचा असल्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील म्हणाले.

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सवाचा शुभारंभ जिल्हाधिकारी अनिल पाटील, पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे, तहसिलदार विरसिंग वसावे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, माविमचे नितिन काळे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ, , बाल कल्याण समितीचे सदस्य अँङ श्रीम. नम्रता नेवगी, बाल कल्याण समितीचे सदस्य प्रा. अमर निर्मळे,  बाल कल्याण समितीचे सदस्य प्रा. श्रीम. माया रहाटे, बाल न्याय मंडळ सदस्य श्रीम. कृतिका कुबल,  पणदूर शिक्षण प्रसारक मंडळ वेताळ बांबर्डे विभाग संस्था अध्यक्ष रघुनाथ गावडे, पणदूर शिक्षण प्रसारक मंडळ वेताळ बांबर्डे विभाग संस्था सचिव नागेंद्र परब, पणदूर कनिष्ठ महाविद्यालय, दादासाहेब तिरोडकर मुख्यध्यापक एस.डी. गावकर आदी उपस्थिती होते. हा महोत्सव 6 ते 8 जानेवारी 2025 या कालावधीत दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय पणदूर तिठा ता. कुडाळ येथे पार पडणार आहे.

पाटील म्हणाले, महोत्सवादरम्यान होणाऱ्या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना वाढीस लागते.  त्यांच्यामध्ये नेतृत्वगुण विकसित होत असल्याने आत्मविश्वास वाढतो. त्यासाठी जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाने जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सवाचे आयोजन केले आहे. विद्यार्थ्यांनी अशा महोत्सवांमध्ये सहभागी व्हावे असेही पाटील म्हणाले.

प्रास्ताविकेत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. रसाळ म्हणाले, जिल्ह्यातील बाल कल्याण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शासकीय स्वयंसेवी संस्थांमध्ये  पुर्नवसनासाठी दाखल झालेल्या अनाथ, निराधार, उन्मार्गी मुलांमधील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्यात एकमेकांमध्ये बंधुभाव, सांघिक भावना व नेतृत्व गुण निर्माण होण्याच्या दृष्टीने दरवर्षी चाचा नेहरु बाल महोत्सव आयोजित केला जातो.  यामध्ये वैयक्तिक नृत्य, गायन, एकपात्री अभिनय, सामुहिक नृत्य, उंच व लांब उडी, कॅरम, बुध्दीबळ, गोळा फेक, कब्बडी, खो-खो, रिले, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी स्पर्धांचे आयोजन केलेले आहे, असेही ते म्हणाले. यावेळी विद्यार्थ्यांना टोपींचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, चाचा नेहरु आणि सरस्वती यांच्या प्रतिमेचे पुजन आणि दीपप्रज्ज्वलन करुन  करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री काटकर यांनी केले.