जिल्हा विधी सेवा केंद्राचे उद्घाटन

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: August 14, 2025 15:46 PM
views 86  views

सिंधुदुर्गनगरी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग मार्फत विधी सेवा केंद्राचे उद्धाटन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग,  जिल्हाधिकारी कार्यालय ओरोस येथे करण्यात आले.  

या विधी सेवा केंद्राचे उद्घाटन डॉ. सुधीर देशपांडे,  प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश , जिल्हा न्यायालय तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग व अनिल पाटील जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, सिंधुदुर्ग यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमास संपूर्णा गुंड्डेवाडी, सचिव, जिल्हा विधी प्राधिकरण, सिंधुदुर्ग,  मच्छिंद्र सुकटे, निवासी उपजिल्हाधिकारी,  शुंभागी साठे, अपर जिल्हाधिकारी, उमेश आईर, सहायक, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सिंधुदुर्ग, पॅनेल विधीज्ञ आशपाक शेख, विधीज्ञ रूपेश परुळेकर तसेच विधी स्वयंसेवक पल्लवी जाधव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग व जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग या कार्यालयातील सर्व कर्मचारि उपस्थित होते. 

हे विधी सेवा केंद्र राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण वीर परिवार सहायता योजना २०२५ प्रमाणे संरक्षण कर्मचारी, माजी सैनिक आणि त्यांच्या अवलंबितांना मालमत्ता विवाद, कल्याणकारी योजना, वैवाहिक वाद, नागरी वाद, आणि इतर कायदेशीर बाबींमध्ये मोफत आणि सक्षम कायदेशीर सेवा आणि मदत प्रदान करण्यासाठी केंद्रीय, राज्य आणि जिल्हा सैनिक कल्याण मंडळांमध्ये विधी सेवा केंद्राची स्थापना करणेत आली आहे. या उपक्रमामुळे सैनिक व त्यांच्या कुटुंबियांना न्यायालयीन प्रक्रियेबाबत योग्‍य माहिती मिळेल व कायदेशीर अडचणींचे निराकरण होण्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.