
सावंतवाडी : शासकिय आधारभूत किंमत भात खरेदी योजना सन २०२२-२३ अंतर्गत भात खरेदी शुभारंभाचा कार्यक्रम सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, यांच्या हस्ते जिल्हा बँकेचे संचालक विद्याधर परब यांच्या उपस्थितीत मळगांव येथे करण्यात आला.
सदर भात खरेदीकरीता शासनाने प्रती क्विंटल रु.२०४०/- एवढा दर जाहीर केला आहे. भात खरेदी ऑनलाईन असलेमुळे, ज्या शेतक-याचे रजिस्ट्रेशन ३० नोव्हेंबर २०२२ पूर्वी होणार आहे. अशाच शेतक-यांनी केंद्रावर भात विक्रीस आणावयाचे आहे. सावंतवाडी तालुका सह. खरेदी विक्री मार्फत सावंतवाडी, मळगाव, मळेवाड, तळवडे, कोलगांव, मडूरा, डेगवे व भेडशी येथे भात खरेदी केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. तरी या योजनेचा सर्व शेतक-यांनी लाभ घ्यावा असे आवाहन मा. श्री. मनिष दळवी साहेब यांनी केले आहे. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी व जिल्हा बँक संचालक परब तसेच संस्थेचे नवनिर्वाचित संचालक प्रमोद गावडे यांनी शेतक-यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले. शेतक-यांनी चालू पीक पेरा नोंदीचा भात शेतीचा ७/१२ आधारकार्ड झेरॉक्स व पासबुकाची झेरॉक्स घेवून भात खरेदी केंद्रावर स्वतः हजर राहून दि. ३०.११.२०२२ पर्यंत शेतकरी नोंदणी करुन घ्यावयाची आहे.
शुभारंभप्रसंगी मळगांव उपसरपंच हनुमंत पेडणेकर, पोलिस पाटील सौ. जाधव तसेच संस्थेचे संचालक प्रमोद सावंत, शशिकांत गावडे, विनायक राऊळ, आत्माराम गावडे, प्रभाकर राऊळ, रघुनाथ रेडकर, दत्ताराम कोळमेकर, नारायण हिराप, भगवान जाधव, संस्थेचे व्यवस्थापक महेश परब, कर्मचारी व पंचक्रोशीतील प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.