
चिपळूण : कृषि पदवीधर विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविणे व कृषि पुरक व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी कौशल्य युक्त कृषि उद्योजक तयार करण्याच्या उद्देशातून प्रमोद महाजन कौशल्य विकास योजनेच्या धर्तीवर शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालय, खरवते-दहिवली येथे आचार्य चाणक्य कौशल्य केंद्र महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास विभाग यांच्या मान्यतेने सुरु करण्यात येणार आहे.या कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी ,महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री,श्री.एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार व श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आॅनलाईन पद्धतीने होणार आहे. या योजनेंतर्गत महाविद्यालयामध्ये दोन प्रमुख विषयांवर कृषि शाखेतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
यामध्ये कृषि प्रक्षेत्र अधिकारी व रोपवाटिका व्यवस्थापक ई.विषयांचा समावेश आहे.या कौशल्य विकास केंद्रामधुन जास्तीत जास्त कृषि पदवीधरांना प्रशिक्षण देवुन आर्थिक व सामाजिक दृष्टिकोनातून सक्षम बनविणे हे महाविद्यालयाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.सदर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील तज्ञ प्राध्यापकांची निवड करण्यात आली असुन त्यांना नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कार्पोरेशन आॅफ ईंडीया व सेक्टर स्कील काॅउनसिल ,न्यु दिल्ली या नामांकित शासकीय संस्थांकडुन मानांकित करण्यात आले आहे.