पाऊस तोंडावर, खतांचा पुरवठा केव्हा होणार ?

RCFकडून खत पुरवठा करताना दिरंगाई
Edited by: उमेश बुचडे
Published on: May 30, 2023 19:09 PM
views 79  views

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरसीएफ कंपनीकडून सुफला व युरीया खतांचा पुरवठा केला जातो. मात्र यावर्षी झाराप रेक पॉईंट येथे खत उतरण्याचे २५ मे पर्यंत नियोजन करण्यात आले होते. आता ३० मे उजाडला तरी अद्यापही सुफला व युरीया खत येण्याचे लक्षणे दिसुन येत नाही. पाऊस तोंडावर आला , तरी  खरीप हंगाम खतांचा पुरवठा नसल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहे. तालुका शेतकरी खरेदी - विक्री संघ , विकास सोसायट्यांमध्ये शेकडो शेतकरी दररोज फे-या मारत आहेत. वेळेत खत पुरवठा न झाल्यास डोंगराळ भागातील शेतक-यांना बागांमध्ये खत नेताना मोठ्या अडचणी निर्माण होतात. त्यामुळे सर्व सामान्य शेतक-यांमध्ये मोठी नाराजी निर्माण झालेली आहे. आरसीएफ कंपनीकडून खत पुरवठा करताना दिरंगाई होताना दिसत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दरवर्षी आरसीएफ कंपनीकडून रत्नागिरीमध्ये रेक पॉईंट वर लोडींग करुन खत पुरवठा केला जात होता. त्यावेळी वाहतुकदार वेळेत खत पुरवठा होत नसल्यामुळे शेतक-यांना विलंब होत असायचा. त्यातही बोगस खत पुरवठा होण्याची भिती होती. त्यामुळे यावर्षी आरसीएफ कंपनीचा होखत पुरवठा लवकर होण्यासाठी पालकमंत्री रविंद्र चव्हाण , जिल्हा बॅंक अध्यक्ष मनिष दळवी व सर्व अधिकारी , कंपनीच्या अधिका-यांनी झाराप टर्मिनलला आरसीएफ कडून लोडींग करण्याचे नियोजन केले. झारापला रेक पॉईंटला संभाव्य नियोजनानुसार २५ मे पर्यंत सुफला आणि युरीया खत २३०० मॅट्रीक टन उतरणार होते.  त्याला कोकण रेल्वे यांना मान्यता दिली. मात्र खरीप हंगामासाठी सुफला १८०० मॅट्रीक टन युरीया ५०० मॅट्रीक टन खतांची मागणी आहे. आता मे महिना संपत आला तरी खत उपलब्ध झाले नाही. सध्या या खतांची मागणाी जिल्ह्यातील सर्व शेतकरी खरेदी विक्री संघाकडून करण्यात आली आहे.

आता शेतकरी खरेदी विक्री संघाकडे गावागावांतुन शेकडो शेतकरी खतांसाठी येत आहेत.  त्यांना खत उपलब्ध होत नसल्याने माघारी परतावे लागत आहे. पाऊस अवघ्या तोंडावर आला असताना खताचे नियोजन ढासळल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. याबाबत लोकप्रतिनिधींनी आवाज उठवावा, अशी मागणी  शेतक-यांमधुन केली जात आहे. दरम्यान रत्नागिरी रेक पॉईंटवरुन मागणीनुसार काही विकास संस्थांमध्ये खत पुरवठा आरसीएफ कंपनीमधुन केला जात आहे.