हत्तीरोगाच्या पार्श्वभूमीवर आ. वैभव नाईकांच्या महत्वाच्या सूचना

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: July 27, 2024 14:16 PM
views 93  views

मालवण : मालवण शहरात हत्तीरोगाचे रुग्ण वाढत असल्याने आमदार वैभव नाईक यांनी रात्री दहा वाजता ग्रामीण रुग्णालयात जाऊन आढावा घेतला. शहरात सर्वत्र फवारणी करावी, गटारे स्वच्छ करताना ती बंदिस्त करा अशा सूचना त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना केल्या.

मालवण शहरामध्ये हत्तीरोग आजाराचे रुग्ण सापडल्यानंतर आमदार वैभव नाईक यांनी आज सकाळीच मालवण तहसीलदार यांच्यासहित शहरातील प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. आज दिवसभर मालवण शहरातील विविध भागात फवारणी करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या होत्या, त्याचप्रमाणे तालुका आरोग्य अधिकारी यांना मालवण शहरातील नागरिकांचे रक्ताचे नमुने घेऊन तपासणी करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर आज रात्री दहा वाजता आमदार वैभव नाईक यांनी मालवण ग्रामीण रुग्णालय येथे तालुका आरोग्य अधिकारी यांची भेट घेऊन या संदर्भात दिवसभराचा  आढावा घेतला. मालवण शहरात हत्तीरोगाचे चार रुग्ण सापडल्यामुळे यापुढील काळात योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. मालवण शहरातील संपूर्ण भागात फवारणी वेळेत पूर्ण करा, त्याचप्रमाणे शहरातील खुले नाले, दुर्गंधीयुक्त परिसर, गटारे, त्याचप्रमाणे अस्वच्छता असलेली सर्व ठिकाणे बंदिस्त व स्वच्छ करण्याच्या सूचना यावेळी आमदार वैभव नाईक यांनी दिल्या. संपूर्ण शहरामध्ये नागरिकांना हत्तीरोग संदर्भात जनजागृती करण्याची सूचना यावेळी देण्यात आली. 

मालवण शहरातील हत्तीरोगाच्या वाढत्या रुग्णांच्या आकड्या संदर्भात आमदार वैभव नाईक यांनी फोन द्वारे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांच्याशी चर्चा केली. त्याचप्रमाणे आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. दीपक माने यांना मालवण शहरामध्ये येऊन आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत आढावा बैठक घेण्याची सूचना केली. उद्या (दिनांक 27 जुलै) उपसंचालक डॉ. दिपक माने मालवण शहरांमध्ये भेट देऊन हत्ती रुग्ण रोगासंदर्भात नियोजनात्मक आढावा बैठक घेतील.

यावेळी यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर धनगे, मालवण पंचायत समितीचे आरोग्य विस्तार अधिकारी सुरज बांगर, यांच्यासहित मंदार केणी, यतीन खोत, बाबी जोगी, महेंद्र माडगूत, महेश जावकर, प्रसाद आडवणकर, मनोज मोंडकर, सचिन गिरकर उपस्थित होते