
सावर्डे : कोकणातील विद्यार्थ्यांच्याकडे बौद्धिक क्षमता अनन्यसाधारण आहे मात्र आजच्या आधुनिक काळातही ग्रामीण भागातील बऱ्याच मुलांना अनेक आधुनिक सोयी सुविधांपासून वंचित राहावे लागते त्यामुळे विद्यार्थ्यांच्यामध्ये न्यूनगंड निर्माण होण्याची शक्यता असते आणि म्हणूनच जे शालेय जीवनात माझ्या बाबतीत घडले ते माझ्या ग्रामीण विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडू नये म्हणून आम्ही यादवराव घाग प्रतिष्ठानच्यावतीने चिपळूण, संगमेश्वर व गुहागर या तालुक्यातील अनेक शाळांमध्ये प्रश्नसंचाचे वाटप करतो आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचे काम करतो असे प्रतिपादन प्रतिष्ठानचे अध्यक्ष वीरधवल घाग यांनी याप्रसंगी केले.
गेली पंधरा वर्षे सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात विविध उपक्रम राबणारी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे यादवराव घाग प्रतिष्ठान एक अग्रगण्य प्रतिष्ठान असून या संस्थेच्या वतीने मार्गदर्शन शिबिरे आयोजित केली जातात. या संस्थेकडून सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये अध्ययन करणाऱ्या इयत्ता दहावीतील 256 विद्यार्थ्यांना शालांत प्रमाणपत्र परीक्षेला आत्मविश्वासपूर्वक सामोरे जाण्यासाठी प्रश्नसंच वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी या संस्थेचे अध्यक्ष वीरधवल घाग, मार्गदर्शक हरिश्चंद्र घाग,सचिव अनिल घाग, कार्यकर्ते प्रकाश घाग व संस्थेचे पदाधिकारी, मान्यवर,विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे,उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक उद्धव तोडकर, इयत्ता दहावीचे वर्ग शिक्षक व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी पुढील वर्षापासून शिष्यवृत्तीचेही आयोजन केले जाईल असे मार्गदर्शक हरिश्चंद्र घाग यांनी या ठिकाणी घोषित केले व सावर्डे विद्यालयाचे विद्यार्थी यश प्राप्त करून शिष्यवृत्ती प्राप्त करतील अशी अपेक्षा व्यक्त केली. शाळेच्या अध्ययन अध्यापन व विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या शिस्तीबद्दल सर्वांचे कौतुक केले. विद्यालयाचे उपप्रचार्य विजय चव्हाण यांनी या प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद असून याचा आमचे विद्यार्थी नक्कीच फायदा उचलतील आणि गुणात्मक दृष्ट्या आपली प्रगती साधतील असेच ग्वाही दिली. या कार्यक्रमाचे निवेदन अशोक शितोळे यांनी केले.