साळशीत पारंपारिक शिमगोत्सव उत्साहात..!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: March 31, 2024 14:20 PM
views 62  views

देवगड : चौ-याऐंशी खेड्याचा अधिपती व ऐतिहासिक वारसा लाभलेल्या देवगड तालुक्यातील साळशी येथील इनामदार श्री देव सिद्धेश्वर पावणाई देवस्थानाचा शिमगोत्सव पारंपारिक रितीरिवाजाप्रमाणे साजरा करण्यात आला. गावकोळणीचा लग्नसोहळा आणि धूळ मारण्याच्या कार्यक्रमाने गुरुवारी रात्री या उत्सवाची सांगता झाली.

पाच दिवस चाललेल्या शिमगोत्सवाची फाल्गुन पौर्णिमेपासून सुरुवात झाली. ढोल ताशांच्या गजरात प्रथम श्री वशिक तळखंबा मंदिरासमोर तसेच इनामदार श्री.पावणाई देवालयासमोर गाव होळी आंब्याच्या झाडाची घातली जाते. गावहोळीची ब्राह्मणाकरवी पुजा- अर्चा करून नैवेद्य दाखवण्यात येतो. त्यानंतर इतर ठिकाणच्या होळ्या उभ्या केल्या गेल्या. या उत्सवात होळीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी होळी उत्सवाबाबत होळदेवाकडे कौलप्रसादाने मान्यता घेऊन गावची रखवाली घेतल त्यानंतर कौल- प्रसादास सुरुवात करुन येणा-या लोकांच्या अडीअडचणी सोडविल्या जातात. दररोज रात्री होळीच्या ठिकाणी शिंपी समाजबांधवाच्या वतीने गावकोळीण सजवून तेथे एखादा वग म्हटल्यानंतर मंदिरात तमाशाचा कार्यक्रम होतो. दिवसाच्पावेळी गावात घरोघरी कोळीण फिरते. होळीच्या पाचव्या दिवशी सकाळी निशाण व तळीचे होळदेवाकडे पूजन करून ढोल ताशांच्या गजरात मानक-याच्या घरी निशाण आणी तळी नेतात. त्यानंतर गावात घरोघरी हे निशाण फिरविले जाते. तसेच रात्री शिंपी समाजबांधवांच्या वतीने इनामदार श्री. पावणाई मंदिराच्या सभागृहात गण, गवळण आणि गावकोळणीचा रंगतदार लग्नसोहळा झाल्यानंतर रात्री १२ वाजल्यानंतर धूळ मारुन या उत्सवाची सांगता झाली. पुढील चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला होळी तोडली जाते. यावेळी होळीच्या आंब्ये-यात बांधलेला नारळ वाढवून त्याचा प्रसाद उपस्थितांना वाटप करण्यात आला.