
सावंतवाडी : ओटवणे ग्रामपंचायत, सार्वत्रिक निवडणूकीत 'ओटवणे गाव उत्कर्ष पॅनल' चे सरपंच पदाचे उमेदवार उमेश मधुकर गांवकर यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. मागच्या ५ वर्षांच्या कालावधीत आम्हाला जनतेनं संधी दिली. त्या संधीचे सोने करत मी आणि युतीच्या माध्यमातून २ वर्षांचा कोविड कालावधी असून सुद्धा सव्वाचार कोटी एवढ्या मोठ्या निधीची कामे ओटवणेत मार्गी लावली. २०१२ ते २०१७ या कालावधीत ग्रामपंचायत सत्ता नसताना ५२ लाख २५ हजार एवढा निधी आणला होता. म्हणजेच संधी दिल्यानंतर सन २०१८ ते २०२२ या पाच वर्षांमध्ये तब्बल साडेसहा पट निधी ओटवणे गावच्या विकासासाठी आणला. याच गतीला अधिक चालना देण्यासाठी आम्ही सर्वजण गाव उत्कर्ष पॅनलद्वारे निवडणूक लढवित असून आमच्या पॅनलला ओटवणेवासिय भरघोस मतांनी विजय करतील असा विश्वास उमेश गांवकर यांनी व्यक्त केला.
डोअर टू डोअर प्रचाराला सुरुवात केली असून उत्फुर्त असा प्रतिसाद जनतेतून आम्हाला मिळत आहे. त्यामुळे ओटवणे गाव उत्कर्ष पॅनलचा विजय निश्चित आहे असा दावा त्यांनी केला. तर उमेदवार सायली जाधव, अस्मिता भगत, महेश परब, मंगेश चिले, रत्नमाला गांवकर, अरूण गांवकर, समिक्षा गावकर, मनाली गांवकर, महादेव चव्हाण यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रचारात सहभाग घेत विजयाचा विश्वास व्यक्त केला.