कुडाळमध्ये 'या' दोघांनी उमेदवारी अर्ज घेतले मागे

Edited by:
Published on: November 04, 2024 17:31 PM
views 987  views

सिंधुदुर्गनगरी : कुडाळ - मालवण विधानसभा मतदारसंघासाठी सोमवार दिनांक ४ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ७ पैकी स्नेहा वैभव नाईक व प्रशांत नामदेव सावंत या अपक्ष २ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले, त्यामुळे आता विद्यमान आमदार तथा महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव विजय नाईक, महायुतीचे उमेदवार निलेश नारायण राणे यांच्यासह बहुजन समाज पार्टीचे रवींद्र कसालकर ,महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अनंतराज पाटकर व  अपक्ष उमेदवार उज्वला विजय येळाविकर  या ५ जणांनी आपले उमेदवारी अर्ज कायम ठेवले आहे.त्यामुळे आता कुडाळ विधानसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना होईल हे निश्चित झाले आहे.

कुडाळ विधानसभा मतदारसंघासाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी  कुडाळ मालवण विधानसभा निवडणुकीसाठी एकूण २५ अर्जांची विक्री झाली होती. त्यापैकी ८ जणांनी आपले ११ उमेदवारी अर्ज दाखल केले होते.महाविकास आघाडी, महायुती, बहुजन समाज पार्टी, महाराष्ट्र स्वराज्य पक्ष, रासप या पक्षांसह अपक्ष मिळुन एकूण ८ जणांनी ११ उमेदवारी अर्ज कुडाळ निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांच्याकडे दाखल केले होते. यातील मुंबईस्थित अपक्ष उमेदवार वैभव जयराम नाईक यांचा उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाल्याने ७ जणांचे १० उमेदवारी अर्ज वैध ठरले होते.

दरम्यान, रासपच्या महिला उमेदवार उज्वला विजय येळाविकर (रा. उद्यमनगर कुडाळ) यांच्या उमेदवारी अर्जातील एबी फॉर्म मध्ये त्रुटी असल्यामुळे त्यांना एबी फाॅर्म बाद झाला, परिणामी त्याचा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज राहीला होता.दरम्यान सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अपक्ष उमेदवार स्नेहा वैभव नाईक व जरांगे पाटील यांचे मराठा अपक्ष उमेदवार प्रशांत नामदेव सावंत यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे ,त्यामुळे आता कुडाळ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात ५ उमेदवाराचे अर्ज कायम राहिले आहेत.परिणामी कुडाळ विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार शिवसेनेचे वैभव नाईक महायुतीचे उमेदवार निलेश नारायण राणे यांच्या थेट लढत होणार आहे.