दोडामार्गात अवकाळीने आणली वीजपुरवठयावर अवकळा

Edited by:
Published on: May 13, 2024 14:00 PM
views 249  views

दोडामार्ग : अवकाळी पावसाच्या तडाख्याने दोडामार्ग तालुक्यात गेले तीन दिवस वीजेचा खेलखंदोबा उडाला. त्यात महावितरणच्या भोंगळ कारभार आणि अधिकाऱ्यांचे दूर्लक्ष यामुळे दोडामार्ग तालुक्यातील जनता गेल्या तीन दिवसांपासून वीज पुरवठा बंद असल्याने हैराण असल्याचा आरोप करत सोमवारी तालुक्यातील सर्व घटकातील वीज ग्राहकांनी तालुका कार्यालयावर धडक देत विजेच्या उडालेल्या खेळ खंडोबा बाबत अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. शनिवारी रात्रीपासून सलग  पंचवीस तास वीज बंद असताना सोमवारी सायंकाळीं पुन्हा वीज पुरवठा बंद झाला. यामुळे संतापलेल्या नागरीकांनी नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली वीज अभियंता नलावडे यांना धारेवर धरले.  आपण येथे बसू नका लाईनवर कुठे दोष आहे तो शोधा लोकांना वीज पुरवठा सुरू करुन द्या. लोकांचा उद्रेक होण्याची

वाट बघू नका असा इशारा देत उप कार्यकारी अभियंता यांना लाईनवर जाण्यास भाग पाडले. तर तालुक्यातील तिलारी प्रकल्पावर कोणाला कट्टा येथे महालक्ष्मी वीज निर्मिती केंद्रातून निर्माण होणारी वीज पुन्हा दोडामार्गला नियमित देण्याची जोरदार मागणी सर्व स्तरातून होत आहे.

दोडामार्ग तालुक्यात शनिवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी वादळी वाऱ्या पावसाने दोडामार्ग तालुक्यातील संपूर्ण वीज पुरवठा बंद पडला. २४ तास उलटून देखील वीज पुरवठा सुरू झाला नाही. इन्सुली येथील सब स्टेशन मधून 33 केव्ही ने दोडामार्ग मध्ये होणाऱ्या वीज पुरवठ्यात लाईन मध्ये बिघाड झाल्याने तालुका अंधारात राहिला.  रविवारी दुपारी सुरू झालेला हा पुरवठा पुन्हा सायंकाळी पाऊस झाला आणि खंडित झाला.  यावेळी इंन्सूली ते सासोली लाईन फोल्टी 

झाली. अशी जनतेची दिशाभूल केली जात असल्याचेही नागरीकांनी बोलून दाखवले. लाईनवर आलेली झाडे फांद्या तोडायला संबंधित अधिकारी दूर्लक्ष करत आहेत. यामुळे दोडामार्ग तालुक्यात तीन दिवस वीज पुरवठा बंद आहे. त्यामुळे जनता हैराण झाली. याच पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी  दोडामार्ग तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते व्यापारी, ग्राहक, सरपंच, नगराध्यक्ष भाजपचे पदाधिकारी यांनी दोडामार्ग वीज कार्यालयात धडक दिली. वीज अधिकारी नलावडे यांना जाब विचारला . वीज पुरवठा सुरू झाला पाहिजे यासाठी दोडामार्ग येथील मंडळी झाडे तोडायला पाठवली. हे काम तुमच होत आम्ही जागरण केले. मग तुमची माणस कुठे होती असा सवाल या नागरिकांनी केला. दोडामार्ग तालुक्यात ज्या वेळी वादळी वाऱ्यामुळे झाडे पडता,त वीज वाहिन्या तुटतात तेव्हा स्थानिक मदत करतात, तीन दिवस वीज पुरवठा बंद असताना आपल्याकडून लक्ष का दिले जात नाही. महालक्ष्मी वीज निर्मिती केंद्र बाबत करार संपला याला किती वर्षे झाली. 

आपल्या वरिष्ठांनी ही बाब पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या कानावर का घातली नाही. पालकमंत्री फोन करून जाब विचारतात आणि वीज पुरवठा सुरू होतो. मग हे अगोदर करण्यात काय अडचण आहे.  दोडामार्ग तालुक्यात या पुढे अशी परिस्थिती निर्माण होता कामा नये. यासाठी आतापासूनच दोडामार्ग तालुक्यातील वीज वाहिन्यांवर आलेली झाडे झुडपे तोडून लाईन मोकळी करा. पावसाळा सुरू होण्यापूर्वी तिलारी महालक्ष्मी वीज निर्मिती केंद्र येथून दोडामार्ग तालुक्यात वीज पुरवठा सुरू झाला पाहिजे. यासाठी आवश्यक कागदपत्रे तातडीने द्या. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची आम्ही भेट घेऊन तिलारी महालक्ष्मी वीज निर्मिती केंद्र येथील वीज पुरवठा सासोली फिडरला जोडावी यासाठी पाठपुरावा करू असे खडे बोल नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी वीज अभियंता नलावडे यांना सुनावले. 

दोडामार्ग तालुक्यातील जनतेने गेले तीन दिवस मोठ्या गैरसोयीचा सामना केला आहे. लोकांना पाणी नाही जेवण नाही अनेक व्यापारी यांना नुकसान सोसावे लागले. याला वीज महावितरण अधिकारी कर्मचारी जबाबदार आहेत. काही वीज कर्मचारी जनतेसाठी मरमर काम करतात, पण अधिकारी लक्ष देत नाही. तुम्ही येथे बसून हा प्रश्न सुटणार नाही. तुम्ही साईटवर चला आम्ही येतो सोबत तोवर काम होणार नाही असे नलावडे यांना सांगितले. वीज पुरवठा नसल्याने हैराण झालेल्या अनेकांनी वीज अधिकारी यांना जाब विचारला. यावेळी बहुसंख्येने वीज ग्राहक उपस्थित होते.