
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात दाखल झालेले सरपंच पदाचे सर्वच्या सर्व 95 उमेदवारी अर्ज वैध ठरले असून 389 पैकी 3 सदस्यांचे अर्ज आजच्या छाननीत बाद ठरले आहेत.
दोडामार्ग तालुक्यातील होत असलेल्या 28 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी एकूण 484 नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते. यात सरपंच पदासाठी 95 व सदस्य पदासाठी 389 उमेदवारांनी नामनिर्देशन दाखल केलेत. त्यात सरपंच पदाचे सर्व अर्ज वैध ठरले असून सदस्य पदाचे 3 अर्ज अवैध ठरलेत. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑनलाईन पद्धतीने नामनिर्देशन पत्र दाखल करताना तालुक्यातील उमेदवारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या अंतिम दिवशी ऑफलाइन पद्धतीने उमेदवारांना अर्ज दाखल करण्याची मुभाही देण्यात आली होती. त्यामुळे अंतिम दिवशी शुक्रवारी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी उमेदवारांची मोठी गर्दी होत मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले. या अर्जाची आज छाननी झाली. त्यात सदस्य पदासाठी 389 अर्जापैकी 3 अर्ज अवैध ठरले आहेत. यामध्ये फुकेरी येथील एका उमेदवाराने दोन वेळा अर्ज भरल्याने एक अर्ज अवैध ठरवण्यात आला. तसेच सासोली येथील उमेदवाराचे 21 वर्षाखाली वय असल्याने त्याचा अर्ज अवैध ठरवण्यात आला तर आयी येथील एका उमेदवाराने जात प्रमाणपत्र सादर केले नसल्याने त्याचाही अर्ज अवैध ठरवण्यात आला, अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.