
बांदा : दांडेलीत सुरू असलेले रस्ता खडीकरण व डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे सांगत ग्रामस्थांनी रोखले. जोपर्यंत अधिकारी प्रत्यक्ष कामाची पाहणी करत नाही तोपर्यंत काम बंद ठेवण्याचा पवित्राच ग्रामस्थांनी घेतला. अधिकारी दाखल होताच आक्रमक झालेल्या ग्रामस्थांच्या रोषाला मात्र त्यांना सामोरे जावे लागले. रस्त्याची तीन वर्षे देखभाल व साईडपट्टी निर्धोक करून देणार असल्याची हमी दिल्यानंतर आक्रमक ग्रामस्थ शांत झाले.
गावात निधी मंजूर करून आणण्यासाठी सावंतवाडी येथे अनेक हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे जनतेच्या निधीचा योग्य उपयोग होणे अपेक्षित आहे. परंतु तसे होताना दिसत नसल्यामुळे ग्रामस्थांना आक्रमक भूमिका घ्यावी लागते पण अधिकारी जागेवर हजर राहत नाहीत. अधिकाऱ्यांनी कामावर प्रत्यक्ष देखील ठेवल्यास असे प्रकार होणार नसल्याचे सांगत माजी उपसरपंच योगेश नाईक यांनी नाराजी व्यक्त केली. तीन वर्षात रस्ता खड्डेमय झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी शाखा अभियंता विनय रंगसुर यांची राहील असे सामाजिक कार्यकर्ते अमोल अरोसकर यांनी सांगत आक्रमक पवित्रा घेतला. तर दांडेली सरपंच दादा पालयेकर तसेच ग्रामस्थ आबा माणगावकर यांनी साईडपट्टी धोकादायक बनल्याचे निदर्शनास आणून दिले.
दरम्यान, उपस्थित सर्व ग्रामस्थांचे प्रश्न ऐकून शाखा अभियंता विनय रंगसूर यांनी साईडपट्टीचे बांधकाम करत मजबूत करून देण्याचे आश्वासन दिले व तीन वर्षे रस्ता विना खड्ड्याचा राहील असेही सांगितले.
निकृष्ट दर्जाचे काम अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देताना दांडेली सरपंच दादा पालयेकर, माजी उपसरपंच योगेश नाईक, माजी सरपंच संजू पांगम, ग्रामपंचायत सदस्य निलेश आरोलकर, सामाजिक कार्यकर्ते अमोल आरोसकर तसेच ग्रामस्थ उत्तम मयेकर, राजन मालवणकर, दुर्गेश शेटकर, आबा माणगावकर आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.