आशिये दत्तमंदिरात स्वर-तालाची नित्यनूतन अनुभूती !

तब्बल 32 महिन्यांच्या खंडानंतर रंगली मैफल
Edited by: प्रतिनिधी
Published on: November 01, 2022 15:54 PM
views 203  views

कणकवली : सोमवारच्या संध्याकाळी आशिये येथील दत्तमंदिरात गंधर्व फाउंडेशन तर्फे संगीत मैफिलीचे आयोजन केले होते. सलग 38 महिने सुरू असलेल्या मासिक संगीत सभेला कोविड काळात पडलेल्या ३२ महिन्यांच्या खंडानंतर ही मैफल आयोजित करण्यात आली होती.


पहिल्या सत्रात पं. योगेश सम्सी यांचे शिष्य स्वप्नील भिसे यांचे एकल तबलावादन सादर झाले. युवा पिढीतील उदयोन्मुख कलावंत स्वप्नील यांनी एक तासाच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या वादनात झपतालाची विविध रूपे सादर करताना गुरू पं. योगेश सम्सी, उस्ताद अल्लारखा आणि इतर ज्येष्ठांच्या रचना सादर केल्या. त्यांना त्यांची पत्नी प्रियांका भिसे यांनी संवादिनी साथ केली. पुणे येथील श्री तन्मय देवचाके यांची शिष्या असलेल्या प्रियांका यांनी स्वप्नील यांना बहारदार साथ करत रसिकांना एका दांपत्याच्या सुरेल सहजीवनाचा प्रत्यय दिला. रसिकांच्या निरंतर वाहवाने रंगलेली ही मैफल दीर्घकाळ लक्षात राहील. श्री स्वप्नील यांचे स्वागत जांभवडे येथील रसिक श्री राजाराम काजरेकर आणि प्रियांका यांचे स्वागत संगीत शिक्षिका विश्रांती कोयंडे यांनी केले.


मैफिलीच्या दुसऱ्या सत्रात पूजा आठवले-बाक्रे यांनी स्वरपूजा बांधली. पंडिता शुभदा पराडकर, पं. मंजिरी असनारे आणि पं. पद्मा तळवलकर यांच्या शिष्या असलेल्या पूजा यांनी मैफिलीत फारसा न गायला जाणारा राग सावनी पेश केला. यानंतर रसिकप्रिय राग बागेश्री, रूप पाहता लोचनी हा अभंग आणि भैरवीतील बंदिश सादर करून उत्तरोत्तर रंगत जाणाऱ्या मैफिलीची सांगता केली. स्वप्नील व प्रियांका या जोडीने पूजा बाक्रे यांना तबला व संवादिनी साथ केली. पूजा आठवले यांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन रसिक श्रोत्या स्निग्धा कदम, स्वप्नील भिसे यांचे स्वागत सागर महाडीक आणि प्रियांका यांचे स्वागत डॉ संपदा रेवडेकर यांनी केले.



सोमवार हा दिवाळी सुट्टीनंतरचा पहिला कामकाजाचा दिवस असूनही या मैफिलीला जिल्हाभरातून जाणकार रसिकांची लक्षणीय उपस्थिती होती. देवगड येथील श्री प्रसाद शेवडे, अपर्णा परांजपे, या मैफिलीसाठी गोव्यातून खास आलेले तबलावादक श्री अनिश कोंडुरकर, हार्मोनियम वादक श्री दत्तराज म्हाळशी, जांभवडे येथील डॉ मकरंद काजरेकर, अभिनेते नीलेश पवार, शशिकांत कांबळी,  दामोदर खानोलकर, विलास खानोलकर, किशोर सोगम,  संतोष सुतार, वेदांत कुयेस्कर, स्वानंद जोशी, संतोष जोशी, संगीत शिक्षक श्री संदीप पेंडुरकर, रसिक श्री सुशील कदम, प्रमोद कोयंडे,  विनायक मेस्त्री ;परिसरातील संगीत शिकणारा तरुण विद्यार्थीवर्ग, श्री अभय खडपकर, श्री विजय गांवकर आदी मान्यवरांनी या मैफिलीचा आनंद घेतला.

या गुणवंत कलावंतांना आशिये येथे आणण्यात मनोज मेस्त्री यांच्या पुढाकाराने अभिजात म्युझिक फोरमचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाम सावंत, कलावंताचा परिचय प्रसाद घाणेकर आणि आभार प्रदर्शन संजय कात्रे यांनी केले. उत्तम ध्वनिसंयोजन राजेश गुरव यांचे होते.