बाल शिवाजी इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये 'आषाढी एकादशी' उत्साहात

Edited by: उमेश बुचडे
Published on: June 30, 2023 16:36 PM
views 77  views

कणकवली : अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्थेचे बाल शिवाजी इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये 'आषाढी एकादशी' उत्साहात साजरी करण्यात आली.'आषाढी एकादशी' चे औचित्य साधून विविध कार्यक्रम शाळेत आयोजित करण्यात आले होते. सुरुवातीला प्रशालेच्या शिक्षिका अश्विनी जाधव मॅडम यांनी कार्यक्रमाची थोडक्यात ओळख करून दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा  सुलेखा राणे मॅडम, संदीप सावंत, पालक प्रतिनिधी वैशाली पवार, झगडे सर, श्री. वळंजू सर यांनी दीप प्रज्वलन करून पालखी व विठोबा रुक्मिणीचे पूजन केले. 


इयत्ता 7 वी च्या विद्यार्थ्यांनी 'माऊली माऊली' या गाण्यावर नृत्य सादर केले. इयत्ता 8 वी च्या विद्यार्थ्यांनी 'रखुमाई रखुमाई' या गाण्यावर नृत्य सादर केले. इयत्ता 3री च्या तनिष्का मांजरेकर, इयत्ता 4थीच्या अनन्या मिठ बावकर व आराध्या शिवलकर यांनी 'आषाढी एकादशी' विषयी महत्त्व सांगणारे भाषण सादर केले. बालवर्ग इयत्ता पहिली दुसरीच्या छोट्या चिमुकल्यांनी विठोबा रखुमाईचा वेश परिधान केला होता. 'कैवल्याचा पुतळा', 'विठू माऊली तू' हे अभंग इयत्ता पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. शाळेच्या प्रांगणातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. लेझीमच्या वादनातून 'जय जय विठ्ठल श्री हरी विठ्ठल' असा जयघोष करत 'आषाढी एकादशी' अतिशय उत्साहात साजरी झाली.

श्री. वळंजू सर यांनी पुंडलिकाच्या विठ्ठल भक्तीची गोष्ट सांगितली व 'माता-पितांची सेवा तसेच गुरुंची सेवा जे करतात त्यांच्या भेटीला ईश्वर स्वतःहून येतो म्हणजे सेवेतच ईश्वरी कृपा आहे' असा संदेश विद्यार्थ्यांना दिला. श्री.संदीप सावंत, पालक प्रतिनिधी वैशाली पवार, श्री. झगडे , मुख्याध्यापिका  कुलकर्णी मॅडम यांनी सर्व विद्यार्थ्यांना ईश्वराच्या भक्तीची ओढ असली पाहिजे असा महत्वपूर्ण संदेश दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीच्या कुमारी सृष्टी राणे व कुमारी रितिका खापेकर यांनी केले व शामली कदम मॅडम यांनी आभार व्यक्त केले.