
सावंतवाडी : इंदिरा आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलासाठी चुकीच्या पद्धतीने जमिनीचा वापर झाल्याचा आरोप करत आंबोली येथील रहिवासी गणपत सोमा गावडे यांनी १५ ऑगस्ट रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
श्री. गावडे यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या नावे असलेल्या जमिनीवर इंदिरा आवास योजनेचा लाभ घेऊन तुकाराम राजाराम गावडे यांनी घरकुल बांधले आहे. यासाठी त्यांनी चुकीचा ७/१२ उतारा जोडला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याबाबत त्यांनी यापूर्वीच संबंधित विभागाकडे तक्रार केली होती. या संदर्भात पंचायत समिती सावंतवाडी यांच्याकडून ५ जानेवारी २०२५ रोजी कारवाईचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, त्यानंतर सात महिन्यांपेक्षा जास्त काळ उलटूनही कोणतीही कारवाई झालेली नाही. प्रशासनाकडून या प्रकरणी जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणी तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.