अवयव दानाचा महत्वपूर्ण संदेश

मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झालेल्या ईशानचा सागरी जलतरण स्पर्धेत सहभाग
Edited by:
Published on: December 23, 2024 12:42 PM
views 333  views

मालवण : अवयव दानाचा महत्वपूर्ण संदेश देत मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झालेल्या ठाणे येथील ईशान अनंत आणेकर या 13 वर्षीय जलतरणपटूचा सहभाग लक्षवेधी ठरला. 1 किलोमीटर फिन स्वीमिंग व 3 किलोमीटर सागरी जलतरण स्पर्धा ईशान याने पुर्ण केली. त्याच्या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होतं आहे.

ठाणे महाराष्ट्र येथील १३ वर्षांचा ईशान आणेकर हा लहानपणापासूनच उत्साही आणि हौशी जलतरणपटू आहे. पोहणे हा छंद, तो आनंद म्हणून घेतो. त्याने बायथलॉन आणि ट्रायथलॉन स्पर्धांसह विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला असून, यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. आता ईशानने २१ आणि २२ डिसेंबर २०२४ रोजी मालवणच्या चिवला बीच येथे संपन्न झालेल्या १४ व्या राज्यस्तरीय सागरी जलतरण २०२४ या. स्पर्धेत शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आव्हानात्मक स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि दोन्ही गटातील स्पर्धा यशस्वी पुर्ण केली. 

ईशानच्या यशाला खास बनवणारी गोष्ट म्हणजे मूत्रपिंड आजार झाल्याने नोव्हेंबर २०२१ मध्ये त्याच्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया लिलावती हॅास्पीटल येथे डॅा उमा अली यांच्या मार्गदर्शन खाली झाली. त्याचे वडील अनंत आणेकर यांनी त्याला आपली किडनी दिली आहे. औषध उपचार पुर्ण झाले. मात्र पोहण्याची आवड त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. त्याची आवड पाहून डॉक्टर सल्ल्याने त्याच्या आई वडिलांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये अनुभवी प्रशिक्षक आरती प्रधान मॅडम आणि नरेंद्र पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहण्याचे वर्ग पुन्हा सुरू केले. आणि तेव्हापासून तो उत्साहाने सराव करत आहे. ईशानचा स्पर्धेमधील सहभाग हा अवयव दानाचा महत्त्वाचा संदेश देत असून, किडनी  प्रत्यारोपणानंतरही प्रत्येकजण यशस्वी, सुरळीत आणि आनंदाने आयुष्य जगू शकतात, हीच प्रेरणा ईशान च्या यशस्वीतेतुन मिळत आहे.

ईशान चे वडील खाजगी बँकेत नोकरी करतात. तर आई गृहिणी आहे. हीरानंदानी फौडेशन स्कुल, ठाणे येथे आठवीच्या वर्गात शालेय शिक्षण घेत असलेल्या ईशानला पहिल्यापासूनच स्वीमिंग आवड होती. मात्र आजारपण आल्याने ब्रेक मिळाला. या काळात आई वडिलांनी मोठया धीराने सामना केला. वडिलांनी त्याला आपली किडनी दिली. आज ईशान पुन्हा नव्या जोमाने उत्साहाने यशाला गवसणी घालतो आहे. याचे श्रेय ईशान याला आहेच त्या सोबत आई वडील व प्रशिक्षक आणि डॅाक्टरांनाही आहे.