
कुडाळ : डीगस ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील तळेवाडी व चोरगेवाडी धरणाच्या कालव्यांची दुरुस्ती व साफसफाई तत्काळ करा, तसेच चोरगेवाडी धरणाच्या डाव्या कालव्याची पाईपलाईन द्वारे काम करण्यात यावे अशी मागणी ग्रामपंचायत डिगस सरपंच उपसरपंच व ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे सिंधुदुर्ग पाटबंधारे विभागाचे उप विभागीय अधिकारी प्रभाकर पाटील तसेच शाखा अधिकारी रमेश जोशी यांच्याकडे केली आहे.
डिगस ग्रामपंचायत येथे आज तळेवाडी व चोरगेवाडी तलावा संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला डीगस गावच्या सरपंच पुनम पवार, उपसरपंच मनोज पाताडे , माजी सरपंच सतीश सुर्वे ग्राप सदस्य साक्षी सावंत, ग्रामस्थ सचिन चोरगे, संदीप धावले आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
डिगस ग्रामपंचायत च्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, डिगस ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील लघु पाटबंधारे विभागाअंतर्गत तळेवाडी व चोरगे वाडी धरणांच्या नादुरुस्त कालव्यांमुळे व साफसफाई न केल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतजमहेत होणाऱ्या पाण्याच्या अतिविसर्गामुळे भरपूर नुकसान झालेले आहे त्यामुळे या कालव्यांची साफसफाई व दुरुस्ती लवकरात लवकर करून मिळावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे, मात्र लघुपाटबंधारे विभाग यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे असे या निवेदनात म्हटले आहे.
तर ग्रामस्थांच्या वतीने पाटबंधारे विभागाला देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे कि, डिगस चोरगेवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून चोरगेवाडी, धावले वाडी, घाण्याचीवाडी सुर्वेवाडी येथे पाणी पुरवठा केला जातो. सदर पाणी पुरवठा उघड्या पाट चरीतून केला जातो. त्यामुळं पाणी पुरवठा करताना पाणी मोठ्या प्रमाणात वाया जात असून बऱ्याच जमिनीत दलदल होऊन नापीक बनल्या असून शेतकयांचे खूप नुकसान होते. त्यामुळे सिमेंट हाल्फ राउंड पाईप लाईन द्वारे पाणी पुरवठा केल्यास पाणी वाया जाणार नाही तसेच पाण्याखाली येणाऱ्या क्षेत्रात सुद्धा वाढ होईल. या पाईप लाईनचे काम करताना कोणत्याही शेतकऱ्याकडून कामास विरोध होणार नसुन सदर डाव्या कालव्याच्या जमिनीचे शासनाकडुन कोणतेही देणे नसुन लागवडी खाली येणाऱ्या क्षेत्राच्या सर्व जमीन मालकांची मागणी आहे. तरी कृपया डाव्या कालव्याची हाल्फ सिमेंट पाईप लाईनचे काम लवकरात लवकर मंजुर करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.