
कणकवली : कणकवली शहरातील विविध प्रश्नांबाबत नगरपंचायत, पोलीस प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून शहरातील प्रश्न सोडवण्याची आवश्यकता आहे. उड्डाणपुलाखाली अनधिकृतपणे कायमस्वरुपी केले जाणारे पार्किंग, सर्व्हिस रोडवरील अतिक्रमणे आणि बेशिस्त पार्किंग तात्काळ हटवण्यात यावे. रेलिंगतोडून करण्यात आलेले मिडलकट बंद करण्यात यावेत. यासाठी नगरपंचायत प्रशासनाने ठोस भूमिका घेऊन ही कार्यवाही करावी. बाजारपेठेतील व्यापाºयांचे प्रश्नही तातडीने सोडवावेत. शहराचे विद्रूपीकरण होता कामा नये, याची काळजी घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री नितेश राणे यांनी अधिकाºयांना केल्या.
कणकवली शहरातील विविध समस्यांबाबत व्यापारी संघाच्यावतीने पालकमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर मंत्री राणे यांच्या उपस्थित शुक्रवारी सायंकाळी येथील शासकीय विश्रामगृहावर आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, न. पं. मुख्याधिकारी गौरी पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे, पोलीस निरीक्षक मारुती जगताप, महामार्ग प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंता अनामिका जाधव यांच्यासह अन्य खात्यांचे अधिकारी तसेच ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, कणकवली तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर, उपाध्यक्ष राजन पारकर, विलास कोरगावकर, मंदार आळवे, राजेश राजाध्यक्ष, श्री. पटेल आदी उपस्थित होते.
उड्डाणपुलाखालील कायमस्वरुपी पार्किंग करून उभी करून ठेवलेली वाहने तात्काळ हटवावीत, अशी मागणी व्यापाºयांनी केली. ही वाहने तात्काळ हटवा, आवश्यकता वाटल्यास दंडात्मक कारवाई करा, अशा सूचना पालकमंत्र्यांनी आरटीओ श्री. काळे यांना केल्या. कणकवलीत महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर तसेच फुटपाथवर दुकाने, स्टॉल लावून अतिक्रमण करण्यात आले आहे. उड्डाणपुलाखालीही अनधिकृतपणे स्टॉल उभारण्यात आले आहेत. बेशिस्त पार्किंग, फेरीवाल्यांमुळे वाहतुकीला वारंवार अडथळा होतो याकडे लक्ष वेधण्यात आले. त्यावर पालकमंत्र्यांनी मुख्याधिकाºयांना याबाबत कारवाई करण्याचे निर्देश देत संबंधितांना स्टॉल लावण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. कणकवली आठवडा बाजारावेळी काही बाहेरील विक्रेते स्वस्त दराच्या नावाखाली वजनमापात फसवणूक करतात अशा तक्रारी असल्याचे अशोक करंबेळकर यांनी सांगितले. कणकवली पोलिसांनी वाढत्या चोºयांच्या पार्श्वभूमीवर सतर्क रहावे. शहरातील प्रश्नांबाबत सर्व प्रशासकीय यंत्रणेने समन्वयाने काम करावे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. तसेच एक महिन्याने याबाबत पुन्हा आढावा बैठक घेण्याची ग्वाही दिली.
उड्डाणपुलाखालील गाळ्यांचे होणार सुशोभीकरण
कणकवलीत उड्डाणपुलाखाली सध्या भाजीवाले तसेच अन्य दुकाने थाटण्यात आली आहेत. भाजीवाल्यांना लवकरच कायमस्वरुपी मार्केट उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच त्याठिकाणी पार्किंग व्यवस्थाही केली जाणार आहे. मात्र तोपर्यंत टप्प्याटप्प्याने उड्डाणपुलाखालील गाळ्यांचे सुशोभिकरण करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.