
वैभववाडी : वैभववाडी शहरात बसविण्यात आलेले सीसीटीव्ही बंद अवस्थेत आहेत. हे सीसीटीव्ही तात्काळ दुरुस्ती करून सुरू करण्यात यावेत अशी मागणी ठाकरे शिवसेनेने नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्या कडे केली आहे. याबाबतच निवेदन दिले आहे.
शहरात नगरपंचायतीच्यावतीने प्रत्येक प्रभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र यातील काही कॅमेरे बंदावस्थेत आहेत. यावरुन ठाकरे शिवसेनेने नगरपंचायत प्रशासनाला निवेदन दिले आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वैभववाडी शहर हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. याठिकाणी नेहमीच वर्दळ असते. नगरपंचायतीने लाखो रुपये खर्चून सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. मात्र हे कॅमेरे वर्षभर बंद अवस्थेत धुळखात पडले आहेत. याकडे प्रशासन व सत्ताधारी नगरसेवकांचे दुर्लक्ष आहे.
हे सीसीटीव्ही बंद असल्याने अलीकडेच शहरात झालेल्या घरफोडीच्या तपासात अडचणी आल्या. हे सीसीटीव्ही कार्यान्वित असते तर या चोरीला आळा घालण्यासाठी मदत झाली असती. शहरात शासनाकडून कोट्यवधी रुपयांची कामे होत असतात. त्यातून सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्तीला प्राध्यान्य देणं गरजेचं होतं. मात्र तसं प्रशासनाकडून झाले नाही. त्यामुळे लाखों रुपये खर्च करून सीसीटीव्ही धुळखात पडले आहेत. हे सीसीटीव्ही कॅमेरे तात्काळ दुरुस्त करून घ्यावेत अन्यथा नगरपंचायत प्रशासनाला घेराव घालणार असल्याचा इशारा ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.