
चिपळूण : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा टेरव क्रमांक १ शाळेतील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील ११ व तामिळनाडूमधील १ अशा भारतातील बारा किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झाल्याबद्दल ढोल ताशे वाजवून आनंदोत्सव साजरा केला.
संयुक्त राष्ट्र संघाच्या युनेस्को या संस्थेने महाराष्ट्रातील अकरा किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा स्थळ यादीत केला हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक व अभिमानास्पद क्षण आहे. या ११ किल्ल्यांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील सुवर्णदुर्ग या किल्ल्याचाही समावेश झाल्यामुळे विशेष आनंद आहे.
या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये आपली संस्कृती व ऐतिहासिक वारसा या विषयी अभिमान निर्माण करण्याच्या दृष्टीने शाळेचे मुख्याध्यापक दीपक मोने सर यांच्या संकल्पनेतून व संग्रहित ३५० किल्ल्यांचे सचित्र माहितीसह प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शन व आनंदोत्सवाचे उद्घाटन टेरव गावचे मुंबई स्थित ग्रामस्थ व सरस्वती कोचिंग क्लासेसचे संचालक सुधाकर कदम यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.
यावेळी सुमन विद्यालय टेरवचे शिक्षक भंडगे, शाळेचे मुख्याध्यापक दीपक मोने, चिपळूणकर, निशिगंधा कांबळे, अनंत पवार, स्नेहल गायकवाड, प्रवीण सन्मुख, तनुजा मोहिते, हे शिक्षक - शिक्षिका उपस्थित होत्या. या प्रदर्शनाचा लाभ सुमन विद्यालय टेरवचे सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी तसेच जिल्हा परिषद शाळा टेरव १ मधील सर्व विद्यार्थ्यांनी घेतला. या कार्यक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पवार यांनी केले तर आभार प्रवीण सन्मुख यांनी मानले.