अवैध वाळू वाहतूक | आणखी 4 डंपर चालकांना अटक

एकूण 9 जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
Edited by: उमेश बुचडे
Published on: January 17, 2023 16:49 PM
views 377  views

कणकवली : अनधिकृत वाळू वाहतूक करणारे डंपर रोखण्याचा प्रयत्न करताना डंपर चालकांसह घटनास्थळी दोन चारचाकींमधून आलेल्या व्यक्तींनी मालवणचे तहसीलदार श्रीधर पाटील व त्यांच्या पथकाशी बीडवाडी येथे हुज्जत घालतानाच धक्काबुक्की केली होती. याप्रकरणी ९ संशयित आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.


मालवणचे प्रभारी तहसिलदार श्रीधर बाजीराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी संगमेश हनुमंत हलवर, वय २६ वर्षे, रा. आशिये दत्तनगर, ता. कणकवली, मुळ रा. कलमठ बाजारपेठ, संतोष शिवाजी नलावडे, वय ३८ वर्षे, रा. माईण सडेवाडी, ता. कणकवली, हुसेन इब्राहीम शेख, वय ४० वर्षे, रा. साकेडी मुस्लीमवाडी,ता. कणकवली, अजय सदाशिव जाधव, वय ३८ वर्षे, सध्या रा. कणकवली हुन्नरे चाळ, मुळ रा. नरडवे बेरदेवाडी, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग , मिलींद शामसुंदर तेली, वय ३३ वर्षे, रा. बिडवाडी मांगरवाडी, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग यांची सोमवारी पोलीस कोठडी संपल्याने न्यायालयात हजर करण्यात आले.तर रविवारी अटक केलेल्या रोहीत किशोर राजिवडेकर, वय ३२ वर्षे, रा. कलमठ, स्टेट बँक कॉलनी, निखील लवु दळवी, वय २८ वर्षे, रा. कसवण सावंतवाडी, ता. कणकवली, दयानंद दिनकर जाधव, वय २६ वर्षे, रा. वागदे बौध्दवाडी, ता. कणकवली व सुदाम दिगंबर तेली, वय ४३ वर्षे, रा. बिडवाडी मगरवाडी,ता. कणकवली या चार आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले.


या आरोपींविरोधात भा.दं.वि. कलम ३५३, ३५२, ३७९, १४३, २७९. ५०४, ५०६, २०१, सह महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.९ संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.