
कणकवली : सावडाव येथे महाराष्ट्र शासनाच्या नावे असलेल्या गट नं. ८९१ या देवराई जमिनीमधून सावडाव मुख्य रस्ता ते पावणादेवी मंदिर रस्त्याचे काम शासनाची कोणतीही परवानगी न घेता परस्पर सुरू केले आहे. जेसीबीच्या सहाय्याने अनेक वृक्ष उपटून टाकून बेकायदेशीर वृक्षतोड करण्यात आली आहे. याप्रकरणी चौकशी करून कारवाईची मागणी नयना वैभव सावंत यांनी केली आहे. याबाबत त्यांनी कणकवली वनक्षेत्रपाल व तलाठी यांच्याकडे तक्रार अर्ज केला आहे.पण वनविभाग अजूनही गप्पच का आहे असा देखील प्रश्न सावंत यांच्याकडून उपस्थित केला जात आहे. सावंत यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की देवराईतून कोणताही रस्ता जात असल्याची नोंद सातबारा सदरी नाही. तसेच ही जमीन देवराई म्हणजे शासकीय जमीन या जमिनीतील अनेक जुनाट वृक्षांची बेकायदा तोड करून जमिनीत उत्खनन करून रस्ता काढणे चुकीचे आहे. या प्रकरणी आपल्या विभागामार्फत लवकरात लवकर समक्ष पाहणी करून पंचयादी घालून दोषींचा शोध घेऊन योग्य कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.