
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यावर आपले विशेष प्रेम असून, हे प्रेम केवळ निवडणुकीपुरते मर्यादित नाही. येथील युवकांनी केवळ एक हाक दिली तरी, त्यांच्या मदतीसाठी केव्हाही धावून येण्यास तयार आहे, असे स्पष्ट प्रतिपादन युवा नेते विशाल परब यांनी केले.
साटेली (दोडामार्ग) येथे गणराज आदर्श सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ आयोजित दिवाळी शो टाईम, डबलबारी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना परब यांनी दोडामार्ग तालुक्याशी असलेली आपली भावनिक नाळ अधोरेखित केली. युवकांच्या उत्साहाला दाद देत ते म्हणाले, “दोडामार्ग आणि येथील जनतेबद्दल माझ्या मनात विशेष आदर आणि प्रेम आहे. मी एक राजकीय कार्यकर्ता असलो तरी, माझे संबंध केवळ निवडणुकीपुरते नाहीत. या भागातील युवकांनी विश्वासाने हाक दिल्यास, मी त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी नक्कीच धावून येईन.” परब यांच्या या वक्तव्याने उपस्थितांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. हा कार्यक्रम गणराज आदर्श सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी व्यासपीठावर उपसरपंच सुमन डींगणेकर, माजी तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस, दोडामार्ग तालुका सरचिटणीस संजय सातार्डेकर, खोक्रल सरपंच देवेंद्र शेटकर, दोडामार्ग शहराध्यक्ष राजेश फुलारी, माजी सभापती दीप्ती मयेकर आदी मान्यवर उपस्थित होते. मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ व शाल-श्रीफळ देऊन स्वागत केले.











