शिरोड्यातील डंपर चोरी प्रकरणाचा छडा न लावल्यास ठिय्या आंदोलन

शिरोडा पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा इशारा.
Edited by: दिपेश परब
Published on: February 28, 2024 13:39 PM
views 434  views

वेंगुर्ला : शिरोडा गावातून रविवार दि.१८ फेब्रुवारी रोजी पहाटे मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास एम.एच ०७ सी ६१३९ क्रमांकाचा डंपर चोरी होऊन दहा दिवस उलटूनही चोरीस गेलेला डंपर व चोर अद्यापही सापडले नसल्याने  नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.पोलीस प्रशासनाने तपासात गती आणून सदर गुन्ह्यात सहभागी असलेल्यावर कडक कारवाही करावी अन्यथा येत्या आठ दिवसात ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल अशा आशयाचे निवेदन वेंगुर्ला पोलीस निरीक्षक यांना महाराष्ट्र प्रदेश युवामोर्चा उपाध्यक्ष प्रथमेश तेली व माजी जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ यांच्या नेतत्वाखाली शिरोडा पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले.

यापूर्वी शिरोडा पंचक्रोशीमध्ये मच्छीमार जाळीची जाळपोळ करणे, बोटीचे इंजन चोरीला जाणे, दुचाकी चारचाकी, चोरीला जाणे अशा प्रकारचे गुन्हे घडले होते मात्र अद्यापही त्या गुन्ह्यांचा छडा लागलेला नाही.या बाबत नागरिकांमधून पोलीस प्रशासनाच्या कारभारावर असमाधान व्यक्त केले जात आहे.यावेळी शहरातील तसेच गावातील मोक्याच्या व वर्दळीच्या ठिकाणी तसेच शिरोडा, रेडी, आरवली परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत तसेच पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी अशी मागणी करण्यात आली.सदर डंपर चोरी प्रकरणी सहभागी गुन्हेगार लवकरात लवकर न मिळाल्यास वेंगुर्ला पोलीस ठाणे कार्यालयासमोर येत्या आठ दिवसात ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिरोडा पंचक्रोशीतील डंपर चालक - मालक, भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी व ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवामोर्चा उपाध्यक्ष प्रथमेश तेली, वेंगुर्ला भाजपा तालुकाध्यक्ष सुहास गंवडळकार, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ, युवा मोर्चा अध्यक्ष रेडी सागर राणे, राहुल गावडे, संतोष अणसुरकर, हितेश धुरी, भूषण आंगचेकर, सुनील पडवळ, श्रीकृष्ण धानजी, रॉबर्ट फर्नांडिस, लक्ष्मण परब आदी उपस्थित होते.