'अतिथी देवो भव' संकल्पना अंगी बाणवली तर पर्यटनक्षेत्राचा जलद विकास

मुख्यमंत्र्यांचे माजी मुख्य जनसंपर्क अधिकारी सतीश लळीत यांचं प्रतिपादन
Edited by: प्रतिनिधी
Published on: February 02, 2023 19:27 PM
views 215  views

सिंधुदुर्गनगरी : आतिथ्य आणि आतिथ्यशीलतेची संकल्पना फार प्राचीन आहे. तैत्तिरीय उपनिषदात कथन केलेली 'अतिथी देवो भव' ही संकल्पना या क्षेत्रातील सर्वांनी अंगी बाणवली तर पर्यटनक्षेत्राचा जलदगतीने विकास होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांचे माजी मुख्य जनसंपर्क अधिकारी सतीश लळीत यांनी केले.

कणकवली (जानवली) येथील रिगल कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड टुरिझमच्या वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम आणि खाद्य महोत्सवाचे प्रमुख पाहुणे म्हणुन ते बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय शिर्के, संचालिका डॉ. सुमिता शिर्के, प्राचार्य पुरुषोत्तम आरोलकर, जानवलीचे सरपंच अजित पवार, मुंबई विद्यापीठाचे जिल्हा सांस्कृतिक समन्वयक आशिष नाईक, चौकुळ येथील 'डार्क फॉरेस्ट रिट्रिट रिसॉर्ट'चे दिनेश गावडे, अनिश शिर्के, रिगल कॉलेजच्या संगणक अनुप्रयोगाच्या प्राचार्या तृप्ती मोंडकर आदी मान्यवर उपस्थित होते. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेचा एक भाग म्हणुन आयोजित केलेल्या 'कोलीवाडा' खाद्य महोत्सवाचे उद्घाटन श्री. लळीत यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.


 श्री. लळीत म्हणाले की, आतिथ्य क्षेत्रात काम करताना ' जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ' हा मंत्र घेऊन वावरावे लागते. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या दृष्टीने महत्वाच्या अशा आतिथ्य आणि पर्यटन या सेवाक्षेत्रात अमर्याद संधी आहेत. भारत हा मोसमी हवामानाचा देश असल्याने येथे सर्वच ऋतु आल्हाददायक असतात. संस्कृतीमधील वैविध्य, भौगोलिक विविधता, समुद्रकिनारे, पर्वतीय प्रदेश, प्राचीन मंदिरे, ऐतिहासिक किल्ले, आध्यात्मिक परंपरा यामुळे जगभरातील पर्यटकांचे पाय भारताकडे वळतात. आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा राज्यातील पहिला आणि एकमेव पर्यटन जिल्हा आहे. मात्र १९९७ याली म्हणजेच पंचवीस वर्षांपुर्वी पर्यटन जिल्ह्याची घोषणा होऊनही अद्याप पर्यटनक्षेत्राने बाळसे धरलेले नाही. पर्यटनस्थळी अजुनही पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत. अशी अनेक कारणे असली तरी मुख्यत: पर्यटकाच्या सर्व गरजा किफायतशीर दरात, दर्जेदारपणे आणि आतिथ्यशीलतेने भागवणे गरजेचे आहे. व्यवसाय, फायदातोट्याची गणिते यामुळे आपण यात कोठे कमी पडतो आहोत का, याचा विचार व्हायला हवा.


सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे केवळ समुद्रकिनारे असे चुकीचे समीकरण तयार होताना दिसते, असे सांगुन श्री. लळीत म्हणाले की, येथील प्राचीन, मंदिरे, किल्ले, खाद्यसंस्कृती, लोककला यांचे योग्य मार्केटिंग अद्याप झालेले नाही. अलिकडच्या काळात कृषिपर्यटन, वनपर्यटन अशी नवी क्षेत्रे तयार होत आहेत. जिल्ह्यातील काही युवकांनी असे प्रयोग यशस्वीपणे केलेले आहेत. कोविडनंतरच्या जगात मध्यमवर्ग आता मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी बाहेर पडु लागला आहे. पर्यटकांच्या आवडीनिवडी आणि त्यांची आर्थिक कुवत लक्षात घेऊन त्यांना आवश्यक ती सेवा हसतमुखाने दिली तर या व्यवसायाला नक्कीच चांगले दिवस येतील. हॉटेल मॅनेजमेंट आणि टुरिझमचे शिक्षण घेऊन येथुन बाहेर पडणाऱ्या युवक-युवतींनी नोकरी किंवा व्यवसाय करताना याचे सतत भान ठेवावे.


संस्थेचे अध्यक्ष संजय शिर्के म्हणाले की, कोकणातील पर्यटनक्षेत्राचे महत्व आणि वाव लक्षात घेऊनच आपण ही संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या संस्थेमध्ये दर्जेदार शिक्षण आणि कार्यानुभव याची सांगड घातली जाते. यामुळेच संस्थेचे विद्यार्थी उत्तीर्ण होताच चांगल्या संस्थांमध्ये त्यांना लगेचच संधी मिळते. अनेक विद्यार्थ्यांनी स्वत:चे व्यवसायही सुरु करुन यशस्वी केले आहेत. आजच्या बेरोजगारीवर आतिथ्य क्षेत्रातील मोठ्या संधी हेच उत्तर आहे.


यावेळी डॉ. सुमिता शिर्के, आशिष नाईक यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्राचार्य पुरुषोत्तम आरोलकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी कॉलेजच्या प्रांगणात कोळीवाड्याची प्रतिकृती साकारण्यात आली होती. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांबरोबरच, पालक, नागरिक यांची मोठी उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी करमणुकपर कार्यक्रम सादर केले.