
देवगड : देवगड तालुक्यातील पोंभुर्ले - पाटगाव येथील प्रसिद्ध असलेल्या श्री दत्त मंदिरचा जीर्णोद्वार कलशरोहण - मूर्तिप्रतिष्ठापना कार्यक्रम पोंभुर्ले - पाटगाव येथे मोठ्या उत्साहात सुरू आहे. श्री आशादत्त देवस्थान ट्रस्टचे पोंभुर्ले-पाटगाव नूतन श्री दत्त मंदिर मूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा सुरू आहे.
प्रतिष्ठापना होणारी श्री दत्तात्रेयाची मूर्ती अतिशय सुबक आहे. देवगड तालुक्यातील तळेरे-विजयदुर्ग राज्यमार्गावर सुमारेएकशे तीस वर्षाहून अधिक वर्षाची परंपरा लाभलेले पोंभूर्ले- पाटगाव येथील नूतन श्री दत्त मंदिरातील श्री दत्तात्रेय मूर्ती स्थिर प्रतिष्ठापना व कलशारोहण महोत्सव साजरा होत आहे. श्री आशादत्त देवस्थान ट्रस्ट पोंभुर्ले- पाटगांवचे अध्यक्ष बाळकृष्ण अनंत वैद्य यांच्या आजोबांना सन अठराशेच्या काळात या ठिकाणी श्री दत्त पादुका सापडल्या. त्यांनी या ठिकाणी श्री दत्त पादुकांची स्थापना छोट्याशा झोपडीत करुन श्री दत्तजयंती उत्सवास सुरवात केली.
दरम्यान सन १९५२ साली श्री आशादत्त देवस्थान ट्रस्ट पोंभुर्ले-पाटगांव ट्रस्टची स्थापना करण्यात आली. मात्र १९५२ ते २०१२ पर्यंत हे देवस्थान प्रशासनाच्या ताब्यात होते. तर सन २०१३ पासून देवस्थान ट्रस्टच्या ताब्यात देण्यात आले. या नंतर विश्वस्त मंडळाने मंदिराचा जिर्णोध्दार करत श्री दत्तात्रयांचे नूतन मंदिर उभारले आहे. या मंदिरात गुरूवार २४ ते २६ एप्रिल असे तीन दिवस श्री दत्तात्रेय मूर्ती स्थिर प्रतिष्ठापना महोत्सव सुरु झाला आहे.
श्री दत्त मंदिरातील सुशोभीकरण, रंगरंगोटी, कलशारोहन, मुख्य गाभारासह अनेक कामे पूर्ण झाली आहेत. मंडळाचे विश्वस्त कै. अनिल भोगटे हे भव्य दिव्य दत्तमंदिर व्हावे ह्या ध्येयाने आतुर झाले होते. आज त्यांचे स्वप्न सत्यात उतरले आहे.
मंदिराचे काम पूर्ण झाले असले तरी सभोवताली पेव्हर ब्लॉक, स्टोरेज रूम, चेंजिंग रूम, भक्तनिवास तसेच पुजारी निवास बांधकाम, पायवाट आणि चिऱ्याचे कंपाऊंड अशी कामे करावयाची असून त्यांसाठी भक्तांनी सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहन ट्रस्ट पदाधिकाऱ्यांनी केले आहे.