आदर्श गणित शिक्षक पुरस्कार एल. के. डांगी यांना प्रदान

Edited by:
Published on: February 02, 2025 16:53 PM
views 139  views

सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळ संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्यावतीने दिला जाणारा यावर्षीचा आदर्श गणित शिक्षक पुरस्कार कुडासे येथील सरस्वती विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेजचे गणित शिक्षक एल के डांगी यांना प्रदान करण्यात आला. ओरोस येथील माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या सभागृहात झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या १० व्या अधिवेशनात शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत एल के डांगी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या गणित विषयाच्या विविध उपक्रमात एल. के. डांगी यांचा सक्रिय सहभाग असतो. विद्यार्थ्यांमध्ये गणितीय दृष्टीकोन वाढावा यासाठी एल के डांगी यांनी महत्वापूर्ण योगदान दिले. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन एल के डांगी यांना  सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळाने आदर्श गणित शिक्षक पुरस्कार पुरस्कार जाहीर केला होता. एक शांत, संयमी आणि प्रामाणिक गणित शिक्षक अशी एल के डांगी यांची ओळख आहे. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे विविध क्षेत्रासह धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा कल्पना तोरसकर, सर्व संचालक आणि समन्वय समिती पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.