
कुडाळ : मुलांना पारंपारिक शेतीचे ज्ञान मिळावे, शेती करताना येणाऱ्या अडचणी, मिळणारे उत्पादन, कष्ट यांची जाणीव व्हावी ह्या हेतूने आयडियल इंग्लिश स्कूल नेरुरच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मळ्यात नेऊन शेतीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. या कार्यक्रमाचे उदघाटन सेंट्रल बँक नेरुरच्या शाखा व्यवस्थापक सम्रीती गोपाल यांच्या शुभहस्ते करण्यात आले तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषितज्ञ मयुरेश पालव उपस्थित होते. पालव सरांनी पारंपारिक शेती व शास्रोक्त पद्धतीची माहिती दिली.
मुलांनी नांगरणी, लावणी करून प्रत्यक्ष शेती करण्याचा आनंद लुटला. मुलांना कोकणातील आहारातील मुख्य घटक असणारी पेज नाश्त्याला देण्यात आली होती. कीर्ती भोगटे, चैतन्या चव्हाण, आरोही तारी,योगिता म्हाडदळकर, भूषण सारंग, डॉ भंडारी सर यांनी विद्यार्थांसोबत भातपिकाची लावणी केली. मुख्याध्यापक सौरभ पाटकर यांनी ट्रिलर च्या साहाय्याने नांगरणी केली. सर्व विद्यार्थ्यांना शाळेतर्फे दुपारी जेवण देण्यात आले. जमीन मालक सारंग बंधू यांनी या उपक्रमाला मोलाचे सहकार्य केले.
उपक्रम यशस्वी करण्यासाठी वेदिका परब, श्रद्धा गोसावी, सुषमा सुतार, वैभव आकेरकर यांनी मेहनत घेतली. एक दिवस शेतीसाठी या उपक्रमात विद्यार्थांनी मनमुरादपणे शेतीची कामे करत उपक्रमाचा आनंद लुटला.