
सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभाग (आयसीयू) धोकादायक झाला असून जीवीतहानी व भविष्यातील धोका टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी केली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत आरोग्यमंत्र्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना तातडीनं उपाययोजना करण्याचे आदेश दिले.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथे नुतनीकरण करण्यात आलेला अतिदक्षता विभाग विद्युतीकरणाच्या शॉर्ट सर्किटमुळे अत्यंत थोकादायक बनला आहे. २ दिवसांपुर्वी रात्री २ वाजता अतिदक्षता विभागात शॉर्ट सर्किट झाल्याने विद्युत उपकरणे अचानक बंद पडून दरवाजे बंद झाले. आतमध्ये दहाहून अधिक रुग्ण अडकले. त्यामुळे यंत्रणेचीही मध्यरात्री चांगलीच तारांबळ उडाली. त्यामुळे यावर तातडीने उपाययोजना करावी, पुढील जीवीतहानी व धोका टाळण्यासाठी जातीनीशी लक्ष घालावं अशी मागणी मंत्र्यांकडे श्री. सुर्याजी यांनी केली. यावेळी आरोग्यमंत्री श्री. आबिटकर यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांना भ्रमणध्वनीद्वारे फोन करून यावर तातडीने उपाययोजना करावी असे आदेश दिले. यावेळी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, युवासेनेचे तालुकाप्रमुख प्रतिक बांदेकर, संकल्प धारगळकर, प्रथमेश प्रभू, संदीप निवळे आदी उपस्थित होते.