
चिपळूण : राष्ट्रीय अंध कल्याण संघ (नॅब) संस्थेच्या उपाध्यक्षपदी मिरजोळीचे माजी सरपंच, काँग्रेस नेते व उद्योजक ईब्राहिम दलवाई यांची निवड झाली असून, तसेच नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे चेअरमनपद त्यांनी स्वीकारल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
ईब्राहिम दलवाई गेली २० वर्षे नॅब संस्थेत सातत्याने कार्यरत आहेत. संस्थेत कार्य करण्याची संधी श्री. विवेक रेळेकर यांनी दिल्याचा ते नेहमी उल्लेख करतात. संस्थेला उभे करण्यासाठी लागणाऱ्या कष्टांचा अनुभव त्यांनी घेतला असून, संस्थेच्या आजच्या यशामागे माजी अध्यक्ष सुचयअण्णा रेडीज यांचे १५ वर्षांपेक्षा अधिक काळाचे निःस्वार्थ योगदान मोलाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अंध बांधवांसाठी कार्यरत असलेल्या या हॉस्पिटलमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया (कॅटरॅक्ट) आणि विविध सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्याचे समाधान अप्रतिम असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, मुंबई अंजुमन मिरजोळी संस्थेतर्फे संचालित नॅशनल हायस्कूलच्या चेअरमनपदाची जबाबदारीही त्यांनी स्वीकारली आहे. सीबीएसई पॅटर्न अंतर्गत अग्रगण्य शाळा म्हणून नॅशनल हायस्कूलची ओळख निर्माण करण्यात स्थानिक कार्यकारी मंडळ व मुंबईतील पदाधिकाऱ्यांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
ईब्राहिम दलवाई यांनी यापूर्वी डी. बी. जे. कॉलेजच्या संचालक मंडळावर, जिल्हा बँकेच्या संचालक पदावर तसेच सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व राजकीय क्षेत्रात राज्यस्तरीय पदे भूषवून उल्लेखनीय सेवा दिली आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.