
चिपळूण : पाहिले नमन आम्ही कोणाला बोलू..धरतरी मातेला शरण जाऊ..अशी मृदुंगावर थाप मारत नमनाला सुरुवात होत असे. आपल्या जुन्या लोकांनी नमन ही लोककला जपली. माझ्या वडिलांनी मला मार्गदर्शक म्हणून, अभ्यास करायला हवा, हे सांगितलं आणि कोकणची लोककला बघता बघता मोठा झालो. नमन लोककलांतून मला प्रेरणा मिळाली. ही कला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविणं, ते जपणं हे आमचं काम आहे आणि ते मी प्रामाणिकपणे करीत राहीन असे मत अभिनेता ओंकार भोजने यांनी व्यक्त केले.
नमन लोककला संस्थेच्यावतीने येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात लोककला पुरस्कार सोहोळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेता ओंकार भोजने बोलत होते. अंगणी वाजला मृदंग, नाद घुमला गं बाय.. वाड-वडलांनी कला दाविली, माझी धन्य ती माय..., असे शाहीर गोपाळ कारंडे यांचे गीत गात अभिनेता ओमकार भोजने यांनी उपस्थित लोककलावंतांची, रसिकांची मने जिंकली. पुढे बोलताना अभिनेता ओंकार भोजने म्हणाले की, नव्या पिढीसमोर आपण काय ठेवणार आहोत, हे महत्त्वाचं आहे. नमन लोककलेला अधिक राजाश्रय मिळावा, यासाठी ही चळवळ म्हणून - पुढे यायला हवी. अशिक्षित लोक ही कला सादर करतात, हे म्हणणं फार चुकीचं आहे. खऱ्या अर्थाने या मंडळींनी ही कला जपली आणि पुढच्या पिढीपर्यंत आणून पोहोचवली आहे. लहान वयातच माझे काका विजय भोजने, भिकाजी चौगुले यांनी या लोककलेचे संस्कार आमच्यावर केले. पुढच्या पिढीत यदुवीर चौगुले, गणेश चौगुले या जोडगोळीने माझ्यावर संगीताचे संस्कार केले. नमन या लोकलेत नाट्य, संगीत आणि नृत्य या तिन्हींचा संगम असल्यामुळे हे संस्कार माझ्यावर झाले आणि त्याचा पुढे उपयोग झाला, असेही अभिनेता ओंकार भोजने म्हणाले.
नमन लोककला संस्था आयोजित पुरस्कार वितरण सोहोळा रविवारी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात पार पडला. यावेळी जिल्ह्यातील अनेक लोककला जपणाऱ्या कलाकारांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या कामाची दखल घेत नमन संस्थेने त्यांचा सत्कार केला. यावेळी आमदार शेखर निकम, नमन कला संस्थेचे अध्यक्ष रविंद्र मटकर, शाहीर दत्ता आयरे, अभय सहस्रबुद्धे, भाजपचे गुहागरचे तालुकाध्यक्ष आणि कलाकार निलेश सुर्वे, वाहतूक पोलीस निरीक्षक श्री. पवार, नगर पालिकेचे उद्यान विभाग प्रमुख बापू साडविलकर, धनाजी तांबे, धराजी वीर, माजी नगरसेवक उमेश सकपाळ, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव, चिपळूण अर्बन बँकेचे अध्यक्ष मोहन मिरगल, माजी अध्यक्ष निहार गुढेकर, खेर्डीचे माजी सरपंच दशरथ दाभोळकर, माजी सभापती पूजा निकम, अदिती देशपांडे, मोहन पाडावे, विजय मसूरकर, सामाजिक कार्यकर्ते सुयोग चव्हाण, संविधान सन्मान समितीचे गुलाबराव राजे, लेखक झराची वीर, धनाजी तांबे आदी उपस्थित होते.
आमदार शेखर निकम यांनी नमन लोककला येथील ही मंडळी दिवसभर काम करतात आणि रात्री नमन सादर करतात. आर्थिक सहकार्य मिळावं, म्हणून ते झगडत आहेत, मात्र आपण आशिष शेलार यांच्या माध्यमातून हे प्रश्न मार्गी लावू. कलाकारांना ग्रुप इन्शुरन्सच्या माध्यमातून विम्याचे कवच देण्यासाठी आपण प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले. भाजपचे गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांचेही उत्तम भाषण झाले. मी पत्रकिरता केली, लोककलांमध्येही काम केले, त्यामुळे लोककलावंतांचे प्रश्न मला चांगले माहीत आहेत. कोकणात अनेक कलाकार चांगल्या पध्दतीने काम करीत आहेत. अभिनेता ओंकार भोजने यांनी नमन ही लोककला टीव्हीवर आणली व जगभर पोहोचवली, असेही ते म्हणाले. नमन लोककला संस्थेचे अध्यक्ष रविंद्र मटकर यांनी रोखठोक भाषण केले.
आज कलावंतांची उपेक्षा होत आहे. लोकप्रतिधींना हे दिसत नाही का? लोककलावंतांनी विकले जाऊ नये, कलावंतांसारखे जगा, असे आवाहन त्यांनी केले. मुंबईत नमन लोककलेचे केंद्र व्हावे. आज अनेकजण मुंबईत नमन घेऊन जातात, मात्र त्यांना राहाण्यासाठी, विश्रांती करण्यासाठी कुठली जागा नाही. त्यामुळे शासनाने मुंबईत व रत्नागिरीत एक नमन लोक कलाकारांसाठी केंद्र उभं करावं, अशी मागणी त्यांनी केली. महाराष्ट्राची लोकधारामध्ये नमन या लोककलेचा आम्ही समावेश करून घेतला. नमन लोक कलावंतांना न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांच्या हक्कासाठी आमची संस्था सातत्याने पाठपुरावा करीत राहील, असेही त्यांनी सांगितले. अभय सहस्रबुद्धे, दत्ता आयरे, श्री. पवार आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीर शाहीद खेरटकर यांनी केले. शेवटी काटवली येथील नमन सादर झाले.