साळींदराची शिकार ? ; 6 संशयित युवकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Edited by: विनायक गांवस
Published on: February 18, 2024 07:02 AM
views 617  views

सावंतवाडी : वन्यप्राण्यांची शिकार केल्याप्रकरणी आंबोलीच्या जंगलात बंदूक, सुरा आणि बॅटरी घेऊन फिरणाऱ्या ६ संशयित युवकांना वनविभाग व सावंतवाडी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ताब्यात घेतले आहे. ग्रामस्थांना शिकाराचा संशय आल्यानं त्यांनी हा प्रकार उघडकीस आणला. यातील काहीजण सावंतवाडीतील तर काही बांदा येथील आहेत. ही कारवाई रविवारी पहाटे सव्वा चारच्या सुमारास हिरण्यकेशी जंगल परिसरात करण्यात आली. 

अतिक्रमण हटावसाठी गेले तीन दिवस आंबोलीत साखळी उपोषण सुरु आहे. येथे असलेल्या ग्रामस्थांना बंदुकीचा आवाज आला. त्यामुळे त्या ठिकाणी ड्युटी बजावत असलेल्या पोलिसांना त्यांनी याबाबतची माहिती दिली. त्यानंतर शोध घेतल्यानंतर हे ६ ही जण आढळून आले. त्यांनंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. संबंधितांवर कारवाई सुरू आहे अशी माहिती आंबोली वनक्षेत्रपाल विद्या घोडके यांनी दिली. वन्य प्राण्यांची शिकार केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या कारमध्ये प्राण्याचे केस आढळून आले आहेत. त्यामुळे त्या संशयितांनी साळींदराची शिकार केली असावी असा वन अधिकाऱ्यांचा प्राथमिक अंदाज आहे. पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थांना बंदुकीच्या गोळीचा आवाज आला. यावेळी त्यांनी त्या ठिकाणी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना झालेला प्रकार सांगितला. त्यानुसार शोध घेण्यात आला असता ६ जण आढळून आले आहे. त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे बंदूक, सुरी, बॅटऱ्या आदी साहित्य मिळाले आहे. तर सूऱ्याला रक्त लागले होते. त्यामुळे त्यांनी वन्य प्राण्याची शिकार केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे त्या सहाही जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची पुढील चौकशी सुरू आहे असे वनक्षेत्रपाल घोडगे यांनी सांगितले. 

संशयितांमध्ये बाबुराव बाळकृष्ण तेली, सावंतवाडी, न्यु खासकीलवाडा वय - 42 वर्षे, आरबाज नजीर मकानदार श. सावंतवाडी, मोठेवाडा वय - 26 वर्षे, सरफराज बाबर खान रा. बांदा, गडगेवाडी, रजाक गुलजार खान रा. बांदा, गडगेवाडी वय - 23, नेल्सन इजमाईल फर्नांडीस रा. सालईवाडा, सावंतवाडी वय - 42 वर्षे व फरान समिर राजगुरू रा. सालईवाडा सावंतवाडी वय - 26 वर्षे यांचा समावेश असून इनोव्हा कार देखील ताब्यात घेण्यात आली आहे. आंबोलीच्या जंगलात वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी अनेक शिकारी येतात अस गेले काही दिवस बोललं जात आहे. त्या ठिकाणी असलेले कॅमेरे चोरीला गेले होते ते या शिकाऱ्यांनीच पळवले असा आरोप होता. त्यामुळे ते नेमके शिकारी कोण ? त्यांचा शोध घ्या अशी मागणी होती.

या पार्श्वभूमीवर आता स्थानिक युवक या ठिकाणी मिळून आल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून लवकरच इतर माहिती देऊ  असे घोडगे यांनी सांगितले. याप्रसंगी आंबोली वनक्षेत्रपाल विद्या घोडके, वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर, प्राणीमित्र काका भिसे आदींसह वनविभागचे अधिकारी व सावंतवाडी पोलिस उपस्थित होते.