
सावंतवाडी : तत्कालीन प्रांताधिकारी प्रशांत पानवेलकर यांच्यासमोर न्यायनिर्णय होऊन, नगरपालिकेने मोबदला एक वर्षांपूर्वीच प्रांत कार्यालयाकडे जमा केला असताना भूसंपादनाचा जमा वाढीव मोबदला वारंवार मागणी करूनही आजपर्यंत प्रांत कार्यालयाने खात्यात वर्ग न केल्याने, जेष्ठ महिला नागरिक असलेल्या श्रीमती कौसर शेख (वय ७०) रा, सावंतवाडी यांनी उपविभागीय अधिकारी यांना दोन दिवसांत रक्कम खात्यात जमा न झाल्यास १५ ऑगस्ट २४ रोजी उपोषण करण्याची नोटीस दिली आहे.
हा मोबदला मिळण्यासाठी कौसर शेख या वयस्कर, आजारी असताना ही गेले वर्षभर पैसे खात्यात जमा करण्यासाठी पाठपुरावा करीत आहेत. पैसे खात्यात वर्ग करण्यासाठी कुठलीही त्रुटी किंवा संयुक्तिक कारण नसताना, प्रांत कार्यालयातून दोन दिवसांत देतो, लवकरात लवकर देतो, तुमचेच काम चालू आहे असे वारंवार सांगून चाल ढकल केली जात आहेत. याचा श्रीमती कौसर शेख यांना आर्थिक, शारीरिक मानसिक त्रास होत आहे. म्हणून आजारी महिला असूनही नाईलाजास्तव १५ ऑगस्ट २०२४ रोजी त्या आपल्या कुटुंबासहित प्रांत कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहेत. याची प्रत जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, मंत्री दिपक केसरकर, माजी खासदार विनायक राऊत, आमदार नितेश राणे, माजी आमदार राजन तेली यांना त्यांनी पाठवली आहे. आपल्याला न्याय मिळणेसाठी सर्वांना मदतीची विंनती त्यांनी केली आहे.