व्यवसायासाठी ना हरकत दाखला न मिळाल्याने उपोषण

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: August 15, 2025 21:42 PM
views 55  views

कुडाळ : कुडाळमध्ये व्यवसायासाठी ना हरकत दाखला देण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप करत चव्हाण कुटुंबीयांनी स्वातंत्र्यदिनी नगरपंचायतीसमोर उपोषण केले. महादेव चव्हाण आणि सौ. दीपिका चव्हाण यांनी अपार्टमेंटमध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी ना हरकत दाखला मागितला होता, परंतु काही स्थानिक रहिवाशांनी विरोध दर्शवल्यामुळे नगरपंचायत प्रशासन दाखला देण्यास टाळाटाळ करत असल्याचा त्यांचा आरोप आहे.

या टाळाटाळीमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीचा निषेध करण्यासाठी आणि आकारलेला दंड चुकीचा असल्याचा निषेध करण्यासाठी त्यांनी हे उपोषण केले. चव्हाण कुटुंबीयांनी सांगितले की, ते सुशिक्षित असून स्वतःच्या मेहनतीने रोजगार निर्माण करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत आणि घरासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते फेडत आहेत. सुरुवातीला त्यांनी व्यवसायासाठी परवानगी मागितली होती, परंतु ती दिली जात नसल्याने त्यांना उपोषणाचा मार्ग पत्करावा लागला. माहितीच्या अधिकाराखाली मागितलेली माहिती देखील नगरपंचायत देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप त्यांनी केला. या उपोषणाला नाभिक समाज संघटनेने पाठिंबा दिला आहे.

या उपोषणासंदर्भात नगरपंचायतीचे सीईओ अरविंद नातू यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली, तर नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर शिरवलकर यांनी उपोषणकर्त्यांशी संवाद साधून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, पण उपोषण संध्याकाळपर्यंत सुरू राहिले. या प्रकरणात हे कुटुंब सोसायटी आणि नगरपंचायत यांच्यामध्ये अडकले असल्यासारखे दिसत आहे.