वक्रतुंडच्या दोडामार्ग आयडॉलला उदंड प्रतिसाद

इंडियन आयडॉल फेम गायक गणेश मेस्त्री, संज्योती जगदाळे यांनी जिंकली प्रेक्षकांची मने
Edited by: संदीप देसाई
Published on: December 11, 2023 17:27 PM
views 233  views

दोडामार्ग : अंगाला बोचणारी गुलाबी थंडी..... बाजारपेठ मुख्य चौक रोडवर उभारलेली भव्य व आकर्षक  ओपन स्टेज.... त्यातच दोडामार्ग आयडॉल ची क्रेझ आणि दिलखेचक विद्युत रोषणाई आणि तरुणाईचा सळसळून ओसंडून वाहणारा उत्साह अशा सांस्कृतिक वातावरणात सूर नवा ध्यास नवा फेम गायिका संज्योती जगदाळे आणि इंडियन आयडॉल फेम गायक गणेश मेस्त्री यांनी मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील अजरामर अशी गाणी गाऊन तरुणाइला अक्षरशः बेधुंद करून सोडले. याला निमित्त ठरले ते दोडामार्ग बाजारपेठ येथील वक्रतुंड नवयुवक मित्रमंडळाने इंडियन आयडॉल च्या धर्तीवर आयोजीत केलेल्या दोडामार्ग आयडॉल या संगीत स्पर्धेचे.

हे मंडळ विविध सांस्कृतिक कार्यक्रम व कला क्रीडा स्पर्धांचे आयोजन गेल्या अनेक वर्षांपासून शहरात करीत आहे. नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या सहकार्याने मंडळाचे अध्यक्ष मनोज पार्सेकर यांसह विशाल चव्हाण, प्रकाश सावंत,  राजेश फुलारी, बोंद्रे व इतर सदस्य दरवर्षी दोडामार्गची सांस्कृतिक चळवळ वृद्धिंगत व्हावी यासाठी विशेष मेहनत घेत असतात. त्यामुळे ग्रामीण दोडामार्ग तालुक्यात आणि शहरात स्थानिकांना एक मोठ व्यासपीठ मिळू लागलय. दोडामार्ग व अजूबाजुच्या इथल्या मातीतल्या कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी दोडामार्ग आयडॉल स्पर्धा तर दोडामार्ग व गोवा वासियांना सुद्धा विशेष आकर्षण ठरत आहे. याच  कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणून मंडळाने महाराष्ट्रात नावजेलेल्या इंडियन आयडॉल फेम गायक गणेश मेस्त्री व सूर नवा ध्यास नवा फेम गायिका संज्योती जगदाळे या दोघांना या महोत्सवात निमंत्रित केलं होत. दोघांनाही पाहण्यासाठी आणि त्यांच्याकडून सादरीकरण झालेल्या एक से एक गाण्यांचा आनंद घेण्यासाठी तरुणाईने याठिकाणी एकच गर्दी केली होती. शहरात सलग दुसऱ्या वर्षी ओपन स्टेजवर सादर केल्या गेलेल्या या कार्यक्रमास शोभा आणली ती केलेल्या विद्युत रोषणाई आणि लेजर शो ने..! सोबत डीजे ची लाभलेली भन्नाट साथ तर रसिकांना अक्षरशः भुरळ घालून गेली. मराठी सिने सृष्टीतील टाईमपास चित्रपटातील मला वेड लागले प्रेमाचे हे गीत असो अथवा हिंदी सिनेमा आशिकी ...२ मधील संज्योती जगदाळे यांनी गायिलेले मुजको इरादे दे ....कसमे जो वादे दे हे गीत असो ही आणि अशी विविध जुनी आणि नवनवीन गाणी गाऊन प्रेक्षकांना अक्षरशः मंत्रमुग्ध करून सोडले .या दोघांनी गायिलेल्या गीतांवर अनेकानी ठेका धरला. त्यामूळे पुन्हा एकदा यावर्षीचा सुद्धा वक्रतृंड मित्र मंडळाचा दोडामार्ग दीपावली शो टाईम यादगार ठरला