मुक्ताईच्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेला मोठा प्रतिसाद

Edited by: विनायक गांवस
Published on: January 22, 2025 11:46 AM
views 122  views

सावंतवाडी : मुक्ताई ॲकेडमीने कै.सरोज सुर्यकांत पेडणेकर यांच्या स्मरणार्थ 14 वर्षाखालील विदयार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धेत मुला-मुलींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. पहिली ते आठवीच्या 74 स्पर्धकांनी सहभाग घेत आपल्या उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलं.स्पर्धेचे आयोजन सावंतवाडीतील श्री पंचम खेमराज महाविद्यालय येथे करण्यात आले. 

स्पर्धेचे उदघाटन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे जयप्रकाश सावंत, ज्येष्ठ संपादक सीताराम गावडे, जनार्दन लक्ष्मण शिर्सेकर शिक्षण संस्थेच्या अनुपमा शेटगे या मान्यवरांच्या हस्ते आणि मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर, उपाध्यक्षा स्नेहा पेडणेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जयप्रकाश सावंत यांनी मुलांना स्पर्धेसाठी शुभेच्छा देताना खेळण्यातील आनंद घेण्यास सांगितले. तसेच मुक्ताई ॲकेडमीची मुले राष्ट्रीय स्तरावर मिळवत असलेल्या यशाचे कौतुक करत ॲकेडमीच्या उपक्रमांचा, प्रशिक्षणाचा मुलांनी लाभ घेण्याचे आवाहन केले.

प्रमुख पाहुणे सीताराम गावडे यांनी मुलांना मोबाईल पासून लांब राहण्यास सांगुन मन एकाग्र करणा-या बुदधिबळ सारख्या खेळाकडे मुलांनी वळावे असे आवाहन केले. मुक्ताई ॲकेडमीने मागील दहा वर्षांपासून मुलांना एक व्यासपीठ मिळवून दिल्याचे देखील त्यांनी नमूद केले. मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर यांनी मागील दहा वर्षातील ॲकेडमीच्या कार्याचा आढावा घेताना पुढील काळात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील मुलांसाठी उपक्रम राबविणार असल्याचे जाहीर केले.

यावेळी जिल्ह्यातील सर्वात लहान, मुक्ताई ॲकेडमीचा राष्ट्रीय खेळाडू यश सावंत आणि राष्ट्रीय खेळाडू यथार्थ डांगी, विभव राऊळ यांनी आंतरराष्ट्रीय रेटींग मिळवल्याबददल त्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲकेडमीची राष्ट्रीय खेळाडू गार्गी सावंत हीने केले. आभार प्रदर्शन सौ.स्नेहा पेडणेकर यांनी केले.