
सावंतवाडी : नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज असलेल्या तरुणाईला विधायक संदेश देण्यासाठी आणि सामाजिक बांधिलकी जोपासून युवकांमध्ये नवचेतना निर्माण करण्यासाठी कोकणचे नंबर वन महाचॅनेल 'कोकणसाद LIVE' ने सलग तिसऱ्या वर्षी ३१ डिसेंबरच्या रात्री रक्तदान शिबीर आयोजित केले होते. या शिबिरास रक्तदात्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
प्रारंभी उपस्थित असलेल्या युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी, माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर, ज्येष्ठ लेखक व कवी दीपक पटेकर, सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, उपजिल्हा रक्तपेढीचे श्री. धोंड आदींचे स्वागत मुख्य संपादक सागर चव्हाण आणि कार्यकारी संपादक अर्जुन धस्के यांनी केले.
यावेळी प्रास्ताविकातून मुख्य संपादक सागर चव्हाण यांनी सांगितले की, केवळ बातमी देणे एवढीच जबाबदारी न ठेवता त्या पलीकडेही समाजातील विधायक गोष्टी अंगीकारून, सामाजिक बांधिलकी जोपासून 'कोकणसाद LIVE' सातत्याने प्रयत्न करीत आहे. सर्वश्रेष्ठ दान समजल्या जाणाऱ्या रक्तदानातून निश्चितच अनेकांचे प्राण वाचवण्याचे महान कार्य महाचॅनेलच्या हातून घडावे, या उदात्त हेतूने दरवर्षी ३१ डिसेंबरच्या रात्री महाचॅनेलच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित राजू मसूरकर यांनी उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या विविध अपुऱ्या सुविधा व त्यासाठी सामाजिक दायित्व यावर प्रकाशझोत टाकला. कवी दीपक पटेकर यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त करीत अभिनव उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. रुपेश पाटील यांनी केले. यावेळी युवा रक्तदाताची सर्व टीम उपस्थित होती.
'कोकणसाद LIVE'ची हाक, माजी सैनिकांनी दिली साथ!
'नववर्षाच्या स्वागतासाठी सामाजिक बांधिलकी जोपासून रक्तदान करावे!' या 'कोकणसाद LIVE' महाचॅनेलच्या हाकेला माजी सैनिक असलेले चौकुळ गावाचे सुपुत्र झिलू गावडे आणि दत्ताराम गावडे यांनी महत्त्वपूर्ण साथ दिली. देशसेवेनंतर गावडे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली, म्हणून त्यांचा मुख्य संपादक सागर चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.