अतिवृष्टीमुळे नुकसान भरपाईसाठी मोठा निधी मंजूर | मंत्री दीपक केसरकर यांची माहिती

Edited by: विनायक गावस
Published on: July 28, 2023 11:38 AM
views 319  views

सावंतवाडी : मागील वर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सावंतवाडी तालुक्यातील नागरिकांना २ कोटी तर कुडाळ तालुक्यातील नागरिकांना २५ लाख मिळून २ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अशी माहिती शालेय शिक्षण मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. सावंतवाडी मध्ये आपत्ती व्यवस्थापन बैठकी नंतर केसरकर बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी, सीओ प्रजित नायर, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपवनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी आदींसह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सावंतवाडी तालुक्यात माडखोल, बांदा, इन्सुली व परिसरातील लोकांचे नुकसान झाले होते परंतु तांत्रिक अडचणींमुळे ते दिले नव्हते त्यासाठी शासनाने २ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे तसेच यंदाच्या हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत तेही मंजूर करण्यात येणार आहेत असे त्यांनी सांगितले. तर आंबोली घाटातील सौंदर्य जपले पाहिजे. येथील जुने हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही. बांधकाम विभागाच्या जागेत त्यांची दुकाने आहेत. त्यामुळे त्यांना संरक्षण देण्यात आले आहे. परंतु नव्याने कोण स्टॉल उभारत असतील तर खपवून घेतले जाणार नाही. जुने आहेत त्यांना नव्या पद्धतीने हॉटेल बांधून देण्यात येणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी आणखी बांधकाम होऊ नये यासाठी वनविभागाने प्रयत्न करावेत असं मत त्यांनी व्यक्त केल.

दरम्यान, काही शाळांच्या मुलांना पुस्तके मिळाली नाही म्हणून काही लोकांकडून दिखावा केला जात आहे. अचानक पटसंख्या वाढल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. पुस्तकांची मागणी ही गेल्यावर्षीची पटसंख्या लक्षात घेऊन केली जाते. त्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. संबंधित विद्यार्थ्यांना पुस्तके देण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. त्यात कोणी अधिकारी दोषी आढळल्यास निश्चितच कारवाई करू असं विधान त्यांनी केलं.