...कसा साकारला विठ्ठल मंदिराचा १३० फुटी कळस ?

Edited by: विनायक गावस
Published on: June 24, 2023 20:35 PM
views 154  views

सावंतवाडी : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सावंतवाडी शहराला आध्यात्मिक वारसा देखिल तेवढाच मोठा आहे. सावंतवाडीच्या विठ्ठल- रखुमाई मंदिराचा आसमंतात भिडणारा कळस त्याची साक्ष देत उभा आहे. सावंतवाडीकरांचं श्रद्धास्थान असणार हे विठ्ठल मंदीर कोकणातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखलं जात आहे.


धार्मिकदृष्ट्या जाज्वल्य इतिहास असलेल्या सुंदरवाडी अर्थात सावंतवाडीत आजवर अनेक संतमहंत होऊन गेलेत. येथील धार्मिक, आध्यात्मिक परंपरा फार मोठी आहे. सावंतवाडी शहराच्या स्थापनेनंतर १७ व्या शतकात अनेक मंदीर उभारली गेली. त्यातील १७२५ सालात उभारले गेलेलं सावंतवाडीच विठ्ठल-रखुमाई मंदिर. सावंतवाडीच्या राजघराण्यासह शहरातील विठ्ठल भक्तांनी पुढाकार घेत हे मंदीर उभारलं. राजघराण्याशी संबंधित घराण्यांकडून मंदीर बांधणीत मोठ सहकार्य लाभलं होत‌. याचा उल्लेख आजही येथील भिंतीवर आढळतो. ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांचं निवासस्थान देखील या मंदिराशेजारी होत. त्याकाळी पाडगावकर यांच्या पूर्वजांनी व तेथील पौरोहित्य करणाऱ्या कुटुंबांनं विठ्ठल मंदिराच्या देखभालीसाठी विशेष पुढाकार घेतला होता. पंढरपूरच्या चंद्रभागेप्रमाणे मोती तलाव हे मंदिराच्या पायापर्यंत विस्तारलेलं होत असं सांगितलं जातं. आज या मंदिराला तब्बल २९८ वर्ष पूर्ण  होत आहेत. या मंदिराची रचना अद्भुत आहे. शहराच्या चहुबाजूंनी दिसणारा तब्बल १३० फुट उंच कळस नभाला गवसणी घालत आहे. मंदिरातील कोरीव काम, ख्यातनाम चित्रकार सुतार व त्यानंतर दादा मालवणकर यांनी रेखाटलेली छत्रपती शिवाजी महाराज व स्वामी समर्थांची भव्य चित्रे, गरूडाच्या प्रतिकृतीचे प्रवेशद्वार लक्षवेधी आहे. यासह शिवशंकर, गणपती, सुर्यनारायण, देवी अशी पंचायतन देवस्थानं या मंदिरात आहेत. शेजारील पिंपळाखाली हनुमंताच देऊळ आहे. रामापासून ब्रम्हदेवापर्यंतचे देव इथे पहायला मिळतात. तर संत परंपरा येणाऱ्या पिढिला समाजावी या हेतूनं महाराष्ट्र होऊन गेलेल्या समर्थ रामदासांपासून कोकणातील प.पू. टेंब्येस्वामी, सोयरोबानाथ आंबिये तर संत बहिणाबाईंपासून कलावती आईंपर्यंतच्या संतांचा मुर्त्या या मंदिरात दिसून येतात. युद्धकाळ, साथ रोग आदी महाभयंकर संकटात सामना करण्याची शक्ती देखिल इथूनच मिळाली आहे.  


१९८४ मध्ये शहरातील व्यापारी वर्ग व विठ्ठल भक्तांनी एकत्र येऊन मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प केला. विठ्ठल भक्त भाऊ मसुरकर यांनी यासाठी पुढाकार घेतला. या कामात लोकांना सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केल. जीर्णोद्धाराच्या कामाला सुरुवात झाली पावा खणला गेला अन् दत्तजयंतीच्या दिवशी तब्बल १३० फुटांचा कळस उभा राहिला. केवळ १३ व विविध जाती धर्मांच्या माणसांच्या मदतीनं त्यावेळी हा कळस उभारल्याच सांगितले जात. आजसारखी अत्याधुनिक यंत्रणा, मशीनरी नसताना सुद्धा त्याकाळी उभारलेला हा कळस म्हणजे एक नवलच आहे. विठ्ठल मंदिरातील चैतन्याचा आजवर अनेकांना अनुभव आला आहे. मंदीरात दररोज नित्यपाठासह तिनं सत्रात होमहवन चालू असतं. आषाढी,  कार्तिकी एकादशीला शहरातील नागरिक पुढाकार घेऊन अखंड हरिनाम सप्ताहाच आयोजन करतात‌. यावेळी पहाटेची काकडे आरती, दहिदुधानं विठ्ठल स्नान डोळ्यांच पारणं फेडत. ज्यांना पंढरपूरला जाण शक्य होत नाही असे भक्त सावंतवाडीतील या प्रतिपंढरपूरात विठ्ठल भक्तीत तल्लीन होतात.