अडीच वर्षांपासून पगार नाही तर जगावे तरी कसे? बीएसएनएल कर्मचाऱ्यांसमोर प्रश्न

मनसेने वेधले लक्ष
Edited by: रुपेश पाटील
Published on: November 23, 2022 17:41 PM
views 266  views

सावंतवाडी : तब्बल दोन ते अडीच वर्षांपासून काम करून देखील पगार मिळालेला नाही अशा परिस्थितीत कुटुंबाला काय खाऊ घालायचे आणि स्वतः तरी कसे जगायचे? असा गंभीर प्रश्न सावंतवाडी येथील बीएसएनएल कार्यालयात कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना पडला आहे. यासंदर्भात त्यांनी आपली व्यथा मनसे पदाधिकाऱ्यांजवळ मांडल्या  आणि त्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी बीएसएनएलचे प्रबंधक यांची भेट घेतली. मात्र त्यांनी आपण कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात मध्यस्थी केली आहे. मात्र तो प्रश्न सुटू शकला नाही, याला कारणीभूत संबंधित ठेकेदार आहेत, असे सांगितले. अशावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदारांना संपर्क केले असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तर देत बिचाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्काला धुडकावून लावले आहे.

यावेळी शहराध्यक्ष आशिष सुभेदार, तालुका उपाध्यक्ष प्रकाश साटेलकर, सचिव कौस्तुभ नाईक, उपशहर अध्यक्ष प्रवीण गवस, लॉटरी सेना तालुकाध्यक्ष राजेश मामलेकर, तिरोडा शाखाप्रमुख मनोज कांबळी आदी उपस्थित होते.


दरम्यान कोकणसादजवळ या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपली कैफियत मांडली.

या गंभीर घटनेची वस्तुस्थिती पडताळून पाहिली असता, हा सर्व घोळ बीएसएनएलचे कंत्राटदार डी. एम. एंटरप्राइजेस, मुंबई तसेच डीपी टेली सिस्टीम कांदिवली, मुंबई, सिंग कन्स्ट्रक्शन, पुणे व बेलवलकर कन्स्ट्रक्शन या कंत्राटदारांचे हे पाप आहे. ज्यामुळे बिचाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतनापासून वंचित ठेवले गेले आहे, असे निदर्शनास आले आहे.

आगामी ३० नोव्हेंबर रोजी राज ठाकरे यांचा दौरा असल्यामुळे हा सर्व प्रश्न ते सोडवतील, असा आशावाद मनसेचे शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांनी व्यक्त केला आहे.