
मालवण : आमदार वैभव नाईक कुडाळ-मालवण मतदारसंघात त्यांनी गेल्या दहा वर्षात केलेल्या विकासकामांच्या आधारावर जनतेकडे मतदान मागत आहेत. त्याचवेळी नारायण राणे गेली पस्तीस वर्षे आपण केलेल्या विकासकामांचा आधार घेऊन आपले पुत्र माजी खासदार निलेश राणेंसाठी मतदान मागत आहेत. कुडाळ-मालवण मतदारसंघात दोन्ही उमेदवारांच्या प्रचारातला हा सर्वात महत्वाचा फरक आहे. आपल्या मुलाने खासदारकीच्या कार्यकाळात कोणतेही काम केलेले नसून तो अकार्यक्षम आहे याची पोचपावती दस्तरखुद्द नारायण राणे स्वतःच देत आहेत. 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात अवधूत गुप्तेंनी नारायण राणेंना निलेश व नितेश यापैकी जास्त आश्वासक कोण वाटतो असा प्रश्न विचारला, तेव्हा क्षणाचाही विलंब न करता नारायण राणेंनी नितेश राणे आश्वासक वाटतात असे उत्तर दिले. अलीकडेच निलम राणेंनी एका युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत निलेश राणेंपेक्षा नितेश राणेंनाच जास्त मताधिक्य मिळेल आणि महायुतीची सत्ता आल्यास पालकमंत्री पदावर निलेश राणेऐवजी नितेश राणेंचाच पहिला हक्क असेल, असे वक्तव्य केले. याचाच अर्थ नारायण राणे व निलम राणेंना आपले ज्येष्ठ पुत्र निलेश राणे हे नेतृत्व करण्यासाठी लायक वाटत नाहीत. मग निलेश राणेंना कुडाळ-मालवण मतदारसंघातील जनतेने तरी कशापायी निवडून द्यावे...? अगदी अलीकडेच निलेश राणेंनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उद्विग्न होऊन “मी अजून किती दाढी पिकवायची...? माझ्या मागून आलेले अनेकजण मंत्री झाले.” असे उद्गार काढले. एक प्रकारे स्वतःच्या अपयशी राजकीय कारकीर्दीची त्यांनी दिलेली ही जाहीर कबुलीच म्हणावी लागेल.
निलेश राणे हे खासदार म्हणून अपयशी राहिले त्यामुळेच लोकसभेच्या निवडणुकीत त्यांचा सलग दोन वेळा दीड लाख आणि पावणे दोन लाखांच्या मताधिक्याने पराभव झाला. आता लोकसभेत सपशेल अपयशी ठरलेला खासदार विधानसभा निवडणुकीत कुडाळ-मालवण मतदारसंघात उभा करून नारायण राणे नेमके काय साध्य करू पाहत आहेत...? खासदारकीच्या कार्यकाळात निलेश राणे हे दिल्लीच्या वर्तुळात 'मौनी बाबा' म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी लोकसभेत पाच वर्षांच्या कार्यकाळात एकदाही चकार शब्द काढला नाही किंवा कोणत्याही महत्वाच्या विषयावर भाषण सुद्धा केले नाही. लोकसभेचे सभागृहच कशाला इकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात डीपीडीसीच्या मीटिंगमध्ये देखील त्यांनी कधी तोंड उघडले नाही. रत्नागिरी जिल्ह्यात डीपीडीसीच्या बैठकीला पाच वर्षात ते एकदाही उपस्थितच राहिले नाहीत. केंद्राकडून जिल्ह्यासाठी येणाऱ्या निधीसाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा म्हणजेच डीआरडीए हा स्वतंत्र विभाग असतो आणि त्याचे अध्यक्ष संबंधित लोकसभा मतदारसंघाचे खासदार असतात. आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात डीआरडीएची एकही मिटिंग न लावणारा खासदार हा रेकॉर्ड निलेश राणेंच्या नावे आजही कायम आहे. कोकण रेल्वे कमिटी, केंद्रीय दूरसंचार कमिटी, दक्षता कमिटी या विभागातील अनागोंदी कारभाराकडे मतदारसंघाचा खासदार म्हणून त्यांनी कधी ढुंकूनही बघितले नाही. खासदार निधी व पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील कामांची टक्केवारी गोळा करण्यासाठी निलेश राणेंच्या मुंबईतील बांद्रा येथील ऑफिसमध्ये दिनेश मिरचंदानी आणि तुषार पांचाळ या दोन अमराठी माणसांची नेमणूक करण्यात आली होती. निलेश राणेंचे मित्र दोडामार्गात लॅण्डमाफिया बनून लोकांच्या जमीनी बळकावत होते, मायनिंग करून इथल्या निसर्गाचा विध्वंस करत होते आणि काही जण विविध प्रकारच्या तस्करीमध्ये सुद्धा सामील होते. त्यांच्या मालवणमधील एका सहकाऱ्याचे सेक्स स्कँडलमध्ये देखील नाव आले होते. खासदारकीच्या काळात यांनी एकाही दिव्यांगाला साधे सर्टिफिकेट सुद्धा दिले नाही. निलेश राणेंनी खासदार असताना 'मिशन करिअर' नामक संस्था उभारून सरकारी प्रशिक्षण स्वतःच्या नावे राबविले. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी एकाही तरुणाला रोजगार दिला नाही किंवा कोणतेही मिशन दिले नाही. उलटपक्षी या संस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार देण्यास नकार देऊन त्यांना आर्थिक व मानसिक त्रास दिला. खासदार असताना पुणे शहरातील डेक्कन परिसरात ज्याठिकाणी लकी थिएटर होते ती जागा ४०० कोटींना विकत घेऊन त्याठिकाणी लकी मॉल उभारला आणि आज त्या प्रॉपर्टीची किंमत दीड ते दोन हजार कोटी आहे. अशा प्रकारे स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी निलेश राणेंना निवडून द्यायचे का..? हे कुडाळ-मालवण मधील सुज्ञ जनतेने आता ठरवायला हवे.
निलेश राणेंनी खासदारकीच्या कार्यकाळात आपल्याच पक्षातील कणकवली तालुकाध्यक्षावर पंचायत समिती कार्यालयाजवळ दिवसाढवळ्या जीवघेणा हल्ला घडवून आणला होता. यातील हल्लेखोर आजही त्यांच्या ताफ्यात बाऊन्सर म्हणून कार्यरत आहेत. कणकवलीतील कुविख्यात टेंडर टोळीतील तिघांवर कशेडी घाटात जीवघेणा हल्ला करून त्यांना पाशवी मारहाण करणारे निलेश राणेच होते. त्यांनी संदीप सावंत या चिपळूणच्या कार्यकर्त्याचे अपहरण करून त्याला लोखंडी सळ्यांनी मारहाण केली आणि त्याच्या बायकोवर बलात्कार करण्याची धमकी दिली. तत्कालीन रत्नागिरी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रमेश कीर यांना मुलीच्या अपहरणाची धमकी देणारे निलेश राणेच होते आणि इकडे सिंधुदुर्गात दीपक केसरकरांच्या मुलीच्या हॉस्टेलवर गुंड पाठवून तिचे अपहरण करण्याची धमकी देणारेही निलेश राणेच होते. अगदी अलीकडेच त्यांनी आपल्या वडीलांच्या वयाचे असलेल्या भास्कर जाधवांवर गुहागरमध्ये सभा घेऊन सार्वजनिक ठिकाणी आई-बहिणीवरून अतिशय अर्वाच्च व अश्लील भाषेत शिवीगाळ केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर धादांत खोटे आणि अतिशय खालच्या दर्जाचे आरोप केले, ज्यासाठी नारायण राणेंना हात जोडून माफी मागावी लागली. निलेश राणेंवर कोणत्याही प्रकारचे संस्कार नसल्यामुळे ते उत्कृष्ट खासदार किंवा लोकप्रतिनिधी कधीच बनू शकले नाही पण मला वाटते की ते एक चांगली व्यक्तीही बनू शकले नाहीत. आज त्यांच्या या काळ्या कारनाम्यांमुळे राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेल्या त्यांच्या वडीलांना दारोदार फिरून खळा बैठका घेऊन मतांची भिक मागावी लागत आहे. मात्र कुडाळ-मालवण मतदारसंघातील सुज्ञ जनता निलेश राणेंना पुरती ओळखून असल्यामुळे अशा असंस्कारक्षम, अश्लील व शिवराळ भाषा वापरणाऱ्याचा विधानसभा निवडणुकीत पराभव केल्याशिवाय शांत बसणार नाही.