
देवगड : देवगडात झालेल्या मुसळधार अतिवृष्टीमुळे शेतजमिनी बागायती पाण्याखाली गेल्या असून यामुळे वाहतुकीचा वेग देखील मंदावला आहे. हिंदळे बौद्धवाडी येथील प्रतिभा प्रभाकर हिंदळेकर आणि सुमित्रा महादेव हिंदळेकर यांचे समाईक जुने घर अतिवृष्टीमुळे पूर्णपणे कोसळून अंदाजे ५०,००० एवढे नुकसान झाले आहे. सदयस्थितीत घरात कोणीही राहात नव्हते.
देवगड तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार अतिवृष्टीमुळे तालुक्यात ठिकठिकाणी झाडांची पडझड झाली आहे. वीज यंत्रणेत सातत्याने बिघाड होत असल्याने विद्युत पुरवठा ग्रामीण भागात खंडित झाला होता. तर शहरी भागात देखील खंडित झालेल्या विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी वीज कर्मचाऱ्यांची धडपड सुरू होती. या मुसळधार झालेल्या वादळी वाऱ्यामुळे सकल भागातील रस्ते, माड बागायती या ठिकाणी पाणी भरले होते. तर नदी नाले ही दुथडी भरून वाहत होते.काही ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक देखील काही काळ बंद झाली होती. देवगड तालुक्यात पावसाने हाहाकार केला असून गणेश चतुर्थीच्या तोंडावर धोधो कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे.